कल्याण – ३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर वसुलीचे ७६० कोटीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या विविध विभागांमधील ४१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या मार्च अखेरपर्यंत मालमत्ता कर वुसलीच्या कामासाठी वरिष्ठांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी केल्या आहेत. मालमत्ता कर विभागातील कर्मचारी मागील आठ महिने फक्त आराम, मौजमजा करतात आणि फेब्रुवारी महिना आला की आम्हाला मालमत्ता कर वसुलीचे मोठे आव्हान आहे, असा गमजा मारून पालिकेचे आर्थिक नुकसान करत असल्याची पालिकेतील चर्चा आहे.

वडापाव-चहात दंग

३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प सादर झाला की आता आपली जबाबदारी संपली. आता आपण फक्त आराम करायचा असा विचार करून मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी, अधिकारी मागील वर्षानुवर्ष काम करतात, असे पालिकेतील एका जाणकार अधिकाऱ्याने सांगितले. आपली मालमत्ता कर वसूल करण्याची जबाबदारी संपली अशा थाटा मालमत्ता कर विभागातील कर्मचारी कधी वडापाव, तर पालिकांबाहेरील चहाच्या टपऱ्यांवर वेळकाढूपणा करत बसतात. आपल्याला आता नव्या दमाने काम करून १ एप्रिल ते फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता कराची वसुली करायची. मालमत्ता कराचा लक्ष्यांक पूर्ण करण्याचे आपल्यासमोर आव्हान आहे, असा कोणताही अविर्भाव या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर नसतो. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीसाठी दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये पालिका वरिष्ठांना धावपळ करावी लागते, असे या जाणकार अधिकाऱ्याने सांगितले. आता पालिका अधिकाऱ्यांना दररोज १० ते ४० लाख कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

अभय योजनेचे गारूड

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी दरवर्षी पालिका अभय योजना जाहीर करते. या योजनेच्या माध्यमातून पालिकेचे लाखो रूपयांचे नुकसान होते, असे कर विभागातील जुने जाणकार अधिकारी सांगतात. मोठे विकासक, जमीनदार यांच्याकडे मालमत्ता कर, मुक्त जमीन कराच्या कोट्यवधीच्या थकित रकमा असतात.

मागील दोन वर्ष पालिका नगररचना विभागातील एक मातबर अधिकारी विकासकांच्या पानसुपाऱ्या घेऊन ही अभय योजना सतत सुरू राहिल यासाठी प्रयत्नशील होता. त्याप्रमाणे मागील दोन वर्षात अभय योजनेचे पीक आले. या पीकातून पालिकेतील एका वरिष्ठाला ठाण्यात मोठा फ्लॅट मिळाल्याची सर्वदूर चर्चा आहे. यावेळी आयुक्त अभिनव गोयल यांनी ‘त्या’ नगररचनेतील अधिकाऱ्याला आपल्या आसपासही फिरकू दिले नाही आणि त्याचा सल्लाही घेतला नाही.

साहाय्यक आयुक्त सुशेगात

पालिका मुख्यालयात मालमत्ता कर विभागात रवींद्र आंब्रे, धवलू चौरे, जयश्री रसाळकर कार्यरत आहेत. आता नव्याने सुनील लोंढे हे साहाय्यक आयुक्त रूजू झाले आहेत. या साहाय्यक आयुक्तांनी दहा प्रभागांमध्ये फिरून मालमत्ता कर वसुली किती झाली यासाठी प्रयत्न करण्याऐवजी दिवसभर हे साहाय्यक आयुक्त मुख्यालयात बसून प्रभागांना मालमत्ता कर लावण्याच्या नस्ती मुख्यालयात पाठवून द्या या व्यतिरिक्त प्रभावी मालमत्ता कर वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत.

प्रभागात मालमत्तांना कर लावण्याचे अधिकार टिटवाळ्यातील एका साहाय्यक आयुक्ताने केलेल्या उद्योगांमुळे आयुक्तांंनी काढून घेतले आहेत.प्रभागांंमधून अधिक संख्येने कर लावण्याची प्रकरणे अधिक कशी येतील याच ‘लक्ष्यांंका’कडे साहाय्यक आयुक्त नजर ठेऊन असल्याने अर्थसंकल्पातील कराच्या लक्ष्यांकाकडे ते दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी आहेत.