कल्याण – पावसाळ्याच्या काळात वादळी वारा, मुसळधार पावसामुळे कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेच्या विद्युत विभागाने कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागातील एकूण २६८ पथदिवे बदलले आहेत, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे यांनी दिली. पथदिवे रस्त्यांच्या कोपऱ्यांवर, चौकांमध्ये, पदपथांच्या बाजुला असतात. काही पथदिव्यांना दुचाकी, चारचाकी वाहनांनी ठोकर दिलेली असते. त्यामुळे काही पथदिवे खराब झालेले असतात. काही पथदिव्यांच्या खांबांच्या बुडाला गंज पकडून ते खांबा पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे पालिका हद्दीतील अशा सर्व प्रकारच्या पथदिव्यांच्या खांबांची पाहणी करून ते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाप्रकारचे गेल्या दोन महिन्यात सुमारे २७० खराब पथदिव्यांचे खांब बदलण्यात आले आहेत.

कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात दिवाबत्ती सोयीसाठी ३३ हजार ८७० पथदिव्यांचे खांब आणि ४१ हजार ९०७ वीज दिवे बसविण्यात आले आहेत. मागील चार ते पाच वर्षाच्या कालावधीत अपर शहर अभियंता प्रशांत भागवत आणि सहकाऱ्यांनी यामध्ये महत्वाची कामगिरी केली. शहराच्या महत्वाच्या वर्दळीच्या रस्त्यांवर सुशोभित विज दिवे लावण्याची संकल्पना भागवत यांनी यशस्वी करून दाखवली.

पालिकेच्या १० प्रभागातील पालिकेची नागरी आरोग्य केंद्रे, रुग्णालये, प्रभाग कार्यालये आहेत. या कार्यालयांमधील वायरिंग, वातानुकूलित यंत्रे, विद्युत जनरेटर दुरुस्तीची कामे यावेळी करण्यात आली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पथदिवे, दिवाबत्ती सोयीबाबत कोणत्याही तक्रारी येता कामा नयेत अशा सक्त सूचना आयुक्त अभिनव गोयल यांनी विद्युत विभागाला दिल्या आहेत. त्याप्रमाणे अपर शहर अभियंता भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे आणि सहकाऱ्यांनी पालिकेच्या १० प्रभागांमध्ये जाऊन खराब विद्युत यंत्रणेची पाहणी केली. या पाहणीत प्रभागातील काही पथदिवे खांब खराब झाल्याचे समजल्यावर ते तातडीने दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आणि ते पाऊस सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्यात आले.

पावसाळ्यात चार महिने सक्रिय राहणाऱ्या आपत्ती विभागासाठी स्वतंत्र संवाद कक्ष संपर्क क्रमांकासह उपलब्ध करून देण्यात आला आहे. दुरुस्ती कामाच्यावेळी १९८ दुरुस्ती फिटिंग बॅक्रेट, १२ वितरण कंट्रोल पॅनल बदली करण्यात आले आहेत. पालिकेची दूरध्वनी आणि बिनतारी यंत्रणा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुसज्ज ठेवण्यात आली आहे, असे कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे यांनी सांगितले.