कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या दहा प्रभाग हद्दीत दर आठवड्याला मोकळे प्रशस्त रस्ते, मोकळ्या भूखंडांवर आठवडी बाजार भरतात. या बाजाराच्या माध्यमातून गावगुंड, जमीन मालक कमाई करतात. पालिका बाजार परवाना विभागाचे या महत्वपूर्ण आठवडी बाजारांकडे दुर्लक्ष असल्याने या आठवडी बाजारातून पालिकेला एक पैशाचा महसूल मिळत नाही. या बाजारात व्यवसाय करणारे बहुतांशी फेरीवाले हे परप्रांतीय आहेत, अशी धक्कादायक माहिती भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पालिकेच्या महासभेतील चर्चेच्यावेळी दिली.

बाजार परवाना विभागाच्या माध्यमातून पालिकेला दरवर्षी किती उत्पन्न मिळते याविषयावर सभागृहात चर्चा सुरू होती. यावेळी भाजपच्या नगरसेविका खुशबू चौधरी यांनी पालिका हद्दीत मोकळ्या जमिनींवर किती आठवडी बाजार भरतात. या बाजारांच्या माध्यमातून पालिकेला किती महसूल मिळतो, असे प्रश्न उपस्थित केले. प्रत्येक प्रभागांमध्ये फेरीवाले रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करतात. या बाजार, फेरीवाल्यांच्या माध्यमातून मिळणारा महसूल जातो कुठे, असे प्रश्न नगरसेविका चौधरी यांनी प्रशासनाला केले.

फेरीवाले उदंड

पालिका हद्दीत यापूर्वी नऊ हजार फेरीवाले होते. आता ती संख्या वाढली आहे. या फेरीवाल्यांच्या माध्यमातून पालिकेला सुमारे ६० ते ७० कोटीचा महसूल मिळू शकतो. फेरीवाल्यांचे फेरीवाला क्षेत्रात योग्य नियोजन करून त्या माध्यमातून प्रशासनाने महसूल वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना चौधरी यांनी केली. या आठवडी बाजाराच्या माध्यमातून पालिकेचे खालचे अधिकारी श्रीमंत होतात. आणि पालिका मात्र आर्थिकदृष्ट्या पंगू होते, अशी टीका नगरसेविका चौधरी यांनी केली.

यावेळी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी शहराच्या विविध भागात टेम्पोत फळे, भाजीपाला, इतर सामान भरून बाजार भरविण्याचे प्रकार वाढत आहेत. या माध्यमातून पालिकेला एक पैशाचा महसूल मिळत नाही. मोकळ्या जागांवर आठवडी बाजार भरवून त्या ठिकाणी स्थानिक गावगुंंड पैसे कमवितात. पालिका अधिकारी यामध्ये हात धुऊन घेतात आणि अशा बाजारांंना आशीर्वाद देऊन पालिकेचे आर्थिक नुकसान करतात, अशी टीका म्हात्रे यांनी केली.

चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत बाजार परवाना विभागाचे उत्पन्न २४ लाख ते १८ लाख दरम्यान होते. ते आता नगरसेवक राजवट आल्यावर अचानक साडे तीन कोटी कसे झाले. यापूर्वीच्या प्रशासकीय राजवटीतील वाढीव उत्पन्न कोणाच्या घशात गेले, असे प्रश्न नगरसेवक मंदार हळबे यांनी केले. भाजप नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी दहा प्रभाग हद्दीतील आठवडी बाजारांची माहिती घेऊन प्रशासनाने या बाजारात सहभागी प्रत्येक विक्रेत्यांकडून पावती देऊन शुल्क वसूल करावे, अशी सूचना केली. या चर्चेत नगरसेवक मराठे, नगरसेविका शालिनी वायले, सचिन पोटे सहभागी झाले होते.

जमीनदारांची सुपारी

ठाकुर्ली भागातील एक इसम पालिका हद्दीतील मोकळी जमीन असलेल्या जमीनदारांच्या सुपाऱ्या घेतो. तो प्रभाग साहाय्यक आयुक्त, फेरीवाल्यांचे नेते यांच्याशी समन्वय साधून हे आठवडी बाजार भरविण्यासाठी पुढाकार घेत असल्याची पालिकेत चर्चा आहे. या बाजाराच्या मिळणारा महसूल अधिकारी आपल्या खिशात, मध्यस्थ गिळून टाकतात, अशी चर्चा आहे.

पालिका हद्दीत डोंबिवलीत विंग्रो या आठवडी बाजाराला परवानगी आहे. मोकळ्या जमिनींवर भरणाऱ्या इतर आठवडी बाजारांची माहिती पालिकेकडे नाही. ती माहिती घेऊन देण्यात येईल. – रामदास कोकरे उपायुक्त, बाजार परवाना विभाग.