कल्याण : मालमत्ता कराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अवघा एक महिना शिल्लक आहे. अशा परिस्थितीत मालमत्ता कराची प्रभावी वसुली दिसत नसल्याने कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्तांनी मालमत्ता कर वसुलीत दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सुशेगात असलेल्या मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांनी आता कर वसुलीचा धडाका लावला आहे. गुरूवारी कल्याण पश्चिमेत मुरबाड रस्त्यावरील ए ॲन्ड जी रुग्णालयाने पालिकेची ७५ लाख ७४ हजार रूपयांची मालमत्ता कराची रक्कम थकविल्याने या रुग्णालयाचा प्रशासकीय कक्ष सीलबंद करण्यात आला.
मालमत्ता कराची थकित रक्कम भरणा केली जात नाही, तोपर्यंत ही खोली बंद ठेवण्याची तंबी जे प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी रुग्णालय प्रशासनाला दिली आहे. भारत एम. सूचक यांच्या नियंत्रणाखाली हे रुग्णालय चालविले जाते. मागील काही वर्ष रुग्णालयाने पालिकेची मालमत्ता कराची रक्कम थकवली की संचालक डाॅक्टरचे दालन सील केले जात होते. परंतु, रुग्णालय ही अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे रुग्ण सेवा देताना डाॅक्टरना अडथळे येत होते. हा विचार करून जे प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी या रुग्णालयाची रुग्ण सेवा सुरू राहावी असा विचार करून या रुग्णालयाची प्रशासकीय कक्षाची खोली सीलबंद केली.
मालमत्ता कराचे चालू वर्षीचे एकूण उद्दिष्ट ७६० कोटी आहे. मालमत्ता कर हा पालिकेचा महसुली उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. गेल्या वर्षी पालिका निवडणुकांमध्ये पालिका कर्मचारी व्यस्त राहिला. त्यामुळे कर वसुलीवर त्याचा परिणाम झाला. आता आयुक्तांनी कर वसुलीवर भर दिला आहे. दररोज किमान १० लाख ते ५० लाख रूपयांची कराची वसुली पालिका प्रभागातील प्रत्येक साहाय्यक आयुक्ताने केली पाहिजे असा दंडक ठेवण्यात आला आहे. आयुक्त अभिनव गोयल स्वता प्रभागात जाऊन कर वसुली प्रभावीपणे सुरू आहे की नाही याचा आढावा घेत आहेत.
हा आढावा घेताना कर वसुली लिपिक, अधीक्षक यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तात्काळ निलंबित केले जात आहे. आय प्रभागात दोन दिवसापूर्वी मालमत्ता कराची वसुली कमी झाल्याचे दिसताच आयुक्तांनी मालमत्ता कर विभागातील अरविंद काळण, राजेश पाटील या कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले.
कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला कराचा भरणा विहित मुदतीत करावा, असे आवाहन महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागामार्फत करण्यात येत आहे.
टिटवाळा रडारवर
पालिकेच्या अ प्रभागातील बेकायदा बांधकामे, तेथील मालमत्ता कर वसुली, मालमत्तांना लावणे प्रकारामुळे पालिकेतील अधिकारी अ प्रभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तीव्र नाराज आहेत. या प्रभागात बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जात नसल्याच्या वाढत्या तक्रारी पालिकेत येत आहेत. अनेक मालमत्तांची कराची देयके आहेत पण त्या मालमत्ता सापडत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात प्रशासन प्रमुखांकडून टिटवाळ्यातील कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची पालिकेत चर्चा आहे.

