कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीत प्रस्ताव

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरात चार महिन्यांपासून करोना महामारीवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आरोग्य सुविधांसाठी १३ कोटी ३ लाख ९८ हजार रुपये खर्च केले आहेत. या खर्चाचे प्रस्ताव स्थायी समितीच्या गुरुवारी दूरचित्रसंवादाद्वारे होणाऱ्या सभेत मंजुरीसाठी आणले आहेत. प्रस्तावांच्या रकमा २५ लाखांहून अधिक असल्याने प्रशासनाने ठेकेदारांबरोबर या कामांचे

करार करणे, निविदा प्रक्रिया मंजूर करून घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्थायी समितीसमोर हे अत्यावश्यक सेवाकामांचे प्रस्ताव ठेवले आहेत.

महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमानुसार २५ लाखांहून अधिक रक्कम असेल तर ते प्रस्ताव स्थायी समितीकडून प्रशासनाला मंजूर करून घ्यावे लागतात. त्यामुळे हे प्रस्ताव समितीसमोर आणले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. कल्याणमधील रुक्मिणीबाई, होली क्रॉस, शास्त्रीनगर, सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील आरोग्य केंद्र, डोंबिवली जिमखाना, पाटीदार भवनातील करोना आरोग्य सुविधांसाठी प्रशासनाने ठेकेदारांच्या माध्यमातून फर्निचर, खाटा, वाहिनीतून प्राणवायू, व्यक्तिगत सुरक्षा साधन, मुखपट्टी, जंतुनाशक, वातानुकूलन यंत्रणा आदी आवश्यक साधनांचा पुरवठा केला आहे. एका किटमागे प्रशासनाला ३७८ रुपये मोजावे लागल आहेत. एन ९५ मुखपट्टीमागे प्रति नग २६ रुपये दर द्यावा लागला. करोना महामारी कधी संपेल याची शाश्वती नसल्याने चार, पाच, सहा महिन्यांपर्यंत हा खर्च किती येईल त्याप्रमाणे खर्चाचे प्रस्ताव तयार केले आहेत. चार महिन्यांपर्यंत ६४ लाख १७, पाच महिन्यांसाठी ७१ लाख ९९ हजार, सहा महिन्यांसाठी ७९ लाख ८२ हजार खर्च येण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.

डोंबिवली जिमखान्यातील करोना आरोग्य केंद्र सुविधेसाठी पहिले तीन ते सहा महिने कालावधीसाठी एक कोटी ६४ लाख ते दोन कोटी ३७ लाख खर्च प्रस्तावित केला आहे. या ठिकाणच्या विद्युत यंत्रणेसाठी एक कोटी ३० लाख ६० हजार खर्च अपेक्षित आहे. वातानुकूल यंत्रणेसाठी ९१ लाख ५२ हजार खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. येथे ७० खाटा आयसीयू, ५१ खाटा प्राणवायू संलग्नित आहेत.

कल्याण पूर्वेतील शक्तिधाम संकुलातील विलगीकरण केंद्रासाठी २५ लाख ५५ हजार, याच भागातील प्रबोधनकार ठाकरे विलगीकरण केंद्रासाठी १६ लाख ७३ हजार खर्च, कल्याणमधील एनआरसी शाळेतील विलगीकरणासाठी ४८ लाख २८ हजार २९७ खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. मे. दीपाली डिझाइन्स, मे. आर. एम. बी. इव्हेंट मॅनेजमेंट, मे. गणेश अ‍ॅन्ड कंपनी, मे. झा. पी. अशा इतर ठेकेदारांना ही कामे प्रस्तावित केली आहेत. काही वजनदार राजकीय मंडळींचे ठेकेदार या यादीत अधिक असल्याची चर्चा पालिकेते सुरू आहे.

रंगकाम, देखभालीसाठी ५३ लाख

पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय मागील २५ वर्षे वैद्यकीय सुविधा नसल्याने टीकेचे धनी झाले. या रुग्णालयाच्या रंगकाम, देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासनाने ५३ लाख १२ हजार ८६७ रुपये खर्च केले आहेत. या रुग्णालयात दोन कृत्रिम श्वसन यंत्रणा आहेत. त्यामधील एक कायमचे बंद असते. शास्त्रीनगरमध्ये सक्षम कृत्रिम श्वसन यंत्रणा नसल्याने अनेक करोना रुग्णांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात प्राण सोडावे लागले. अशी रुग्णालयाची दारुण परिस्थिती असताना रंगकामावर लाखो रुपये खर्च करून प्रशासन, नगरसेवक काय साध्य करीत आहेत, असे संतप्त प्रश्न रहिवासी उपस्थित करीत आहेत.