कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेचा विकासाभिमुख, पारदर्शक, स्वच्छ आणि सुंदर कारभार करण्यासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाकडून जसे सुशिक्षित महिलेला महापौर पद दिले. त्याचप्रमाणे स्थायी समितीचे सभापतीपदही शिवसेनेकडून नव्या चेहऱ्याच्या, नव्या दमाने शहर विकासाची कामे करणाऱ्या शिंदे शिवसेनेतील नगरसेवकाला दिले जाईल असे नागरिकांना वाटत होते. पण, पुन्हा तोच ठेकेदार विळख्याचा चेहरा असलेल्या मल्लेश शेट्टी यांना शिवसेना शिंदे गटाने संधी दिल्याने शिवसेनेत आणि शहरात तीव्र नाराजी आहे. शेट्टी यांच्या ऐवजी निळजे गावचे नगरसेवक गजानन मोतिराम पाटील यांचेच नाव सभापती पदासाठी निश्चित करण्यात आले होते, ते देवदर्शनासाठी गेल्याने त्यांची संधी हुकली.
कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेना शिंदे गट, भाजप महायुतीची सत्ता असली तरी पालिकेतील मागील ३० वर्षाप्रमाणे पालिकेवर एक हाती हुकमत ठेवण्याची संधी शिवसेना शिंदे गटाने सोडली नाही. आता खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे पालिकेतील सत्तेचे लगाम आपल्या हाती ठेऊन पालिका प्रशासनाचा गाडा चालवित आहेत. पालिकेच्या महापौरपदी महिला, वकील असलेल्या हर्षाली चौधरी यांना बसवून आपण सुशिक्षित चेहरा महापौरपदी बसवल्याचे खा. डाॅ. शिंदे यांनी शहरवासीयांना दाखवून दिले. शहर विकासाची दणकून कामे करून घेण्याची, देण्याची जबाबदारी महापौर चौधरी यांच्यावर आहे.
स्थायी समिती पद हुकले
स्थायी समिती सभापतीपदावर खासदार डाॅ. शिंदे यांच्याकडून एक नवा चेहरा बसवून नव्या दमाने शहर विकासाची कामे करण्याची संधी एक नवख्या नगरसेवकाला मिळेल अशी चर्चा शहरात आणि शिवसेना शिंदे गटात होती. या विचाराप्रमाणे राजकीय वारसा असलेले प्रभाग क्रमांक ३१ ड मधून निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक गजानन मोतिराम पाटील यांना स्थायी समिती सभापती पदी विराजमान करण्याचा निर्णय खासदार डाॅ. शिंदे यांनी घेतला होता. आपण नव्याने निवडून आलेलो. आपणास तात्काळ स्थायी समिती सभापती पदी संधी मिळेल याची सुतराम शक्यता नगरसेवक पाटील यांना नव्हती. ते गेल्या आठवड्यात कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी निघून गेले होते.
देवदर्शन सुरू संधी हुकली
स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज भरण्याचा शासकीय कार्यक्रम जाहीर झाला. आणि अचानक नगरसेवक गजानन पाटील यांचे नाव सभापती पदासाठी चर्चेत आले. डाॅ. शिंदे यांनी नगरसेवक पाटील यांना उमेदवार अर्ज भरण्यासाठी आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगितले. यामुळे २७ गावातील नागरिक, शिवसैनिक आनंदात होते. हा आनंद काही क्षणच टिकला.
पाटील देवदर्शनाला
नगरसेवक पाटील यांना तातडीने सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते विश्वनाथ राणे यांनी संपर्क केला. त्यावेळी ते देवदर्शनासाठी बाहेर असल्याचे समजले. देवदर्शन आटोपून त्यांना तातडीने येण्याच्या सूचना खासदारांकडून देण्यात आल्या. खूप दूरवर असल्याने देवदर्शनावरून तातडीने काही तासात परत येणे आणि उमेदवारी अर्ज भरणे गजानन पाटील यांना शक्य नव्हते. अखेर सभापती पदासाठी यापूर्वी दोन वेळा सभापती पदाचा अनुभव असलेले, स्थायी समितीमधील भाजपमधील मातबर आणि इतरांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी अखेर नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नाराजीचा एकच सूर सर्वदूर पसरला.
