डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातून डोंबिवली एमआयडीसीकडे धावणाऱ्या कल्याण-डोंबिवली पालिका उपक्रमाच्या बस प्रवासी वाहतूक करीत असताना वारंवार बंद पडत आहेत. चालकाच्या अनेक प्रयत्नांनंतरही बस सुरू होत नसल्याने प्रवाशांना नाइलाजाने रिक्षा प्रवासाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. बस बिघाडाचे प्रकार वारंवार घडत असल्याने डोंबिवली एमआयडीसी परिसरातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरात जाण्यासाठी कल्याण-डोंबिवली पालिकेची परिवहन उपक्रमाची बससेवा हा प्रवासासाठी प्रवाशांना रास्त व मध्यम मार्ग आहे. याच प्रवासासाठी प्रवाशांना थेट रिक्षाच्या माध्यमातून ७० ते ८० रूपये, शेअर रिक्षातून २५ ते ३ृ० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे प्रवासी डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौकातून सुटणाऱ्या केडीएमटीच्या बसला सर्वाधिक पसंती देतात.

सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येणारे एमआयडीसी परिसरातील नोकदार, विद्यार्थी केडीएमटीच्या बस प्रवासाला प्राधान्य देतात. रास्त दरात प्रवास होत असल्याने प्रवाशांची या बस प्रवासाला पसंती आहे. एमआयडीसी परिसरातील सोनारपाडा, गोळवली, सागर्ली, आजदे परिसरात राहणारे रहिवासी एमआयडीसीत केडीएमटीच्या बस थांब्यावर येऊन थांबतात. आणि तेथून इच्छित स्थळाचा प्रवास सुरू करतात.

प्रवाशांनी केडीएमटीच्या बस खच्चून भरून जातात. केडीएमटीला मुबलक महसूल मिळून देणारा हा डोंबिवली ते एमआयडीसी निवासी हा महत्वाचा मार्ग ओळखला जातो. बस नादुरुस्त परिवहन सेवेच्या बस सतत नादुरूस्त होण्याचे प्रकार वाढत आहेत.त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. गुरुवारी सकाळी ११.३०च्या दरम्यान डोंबिवली बाजीप्रभू बस थांब्यावरून एमआयडीसी निवासी विभागाकडे निघालेली बस मिलाप नगर बस थांब्यावर नादुरुस्त झाली. २० मिनिटे प्रयत्न करूनही चालकाला ती सुरू करता आली नाही.

या बसमध्ये विद्यार्थी, एमआयडीसीच्या विविध भागात जाणारा नोकरदार वर्ग होता. बस सुरू होत नाही लक्षात आल्यावर वाहकाने प्रवाशांना बसमधून उतरविले. प्रत्येकाची महाविद्यालय, कामाच्या ठिकाणी जाण्याची घाई होती. अशा परिस्थितीत तात्काळ रिक्षा उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रवाशांची धावपळ झाली. केडीएमटीकडे बसची अपुरी संख्या असल्याने अगोदरच निवासी मार्गावर बस वेळापत्रकाप्रमाणे धावत नाहीत. त्यात बस नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. सायंकाळीही बस एमआयडीसीकडे निघाली की रस्त्यात बंद पडते. मग रिक्षासाठी प्रवाशांना अर्धा ते एक तास पळापळ करावी लागते, असे प्रवाशांनी सांगितले.

रस्त्यावर बस बंद पडली की पाठीमागे वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक कोंडी होते. केडीएमटीची बस बंद पडली की तेथे रिक्षा चालक प्रवाशांची अडवणूक करून वाढीव प्रवासी भाडे प्रवाशांकडून आकारतो, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. बस आसनक्षमतेपक्षा अधिक प्रवाशांनी भरली की भार वाढतो. त्यामुळे तांत्रिक बिघाड होऊ शकतो. असे प्रकार झाले की तात्काळ तंत्रज्ञ पाठवून बस तात्काळ सुस्थितीत केली जाते. बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण किरकोळ आहे. डाॅ. विजयकुमार द्वासे, परिवहन व्यवस्थापक, केडीएमटी.