परिवहन प्रशासनाचा प्रवासीभिमुख अर्थसंकल्प सादर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाने येत्या वर्षांत शहरातील ५६ नव्या मार्गावर बसगाडय़ा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. केडीएमटीचे महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी परिवहन समिती सभापती भाऊसाहेब चौधरी यांना बुधवारी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्रवासी सेवेच्या भरभरून तरतुदी करण्यात आल्या आहेत. १७७ कोटी ७३ लाख रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे.

केडीएमटीच्या सध्या ४२ मार्गावर बसफेऱ्या सुरू आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या बस कल्याण डोंबिवलीतील नवीन ५६ मार्गावर सोडण्यात येणार आहेत. बस वेळापत्रकात त्रुटी नको म्हणून संगणक आज्ञावलीचा वापर करण्यात येणार आहे. केडीएमटीच्या ताफ्यात सध्या १०० जुन्या बस आहेत. जवाहरलाल नेहरू अभियानातून प्रशासनाला १८५ बस मिळणार आहेत. त्यामधील ७१ बस उपक्रमात दाखल झाल्या आहेत. उर्वरित ११४ बस लवकरच उपक्रमात दाखल होणार आहेत. दररोज उपक्रमाच्या बसमधून ५० हजार प्रवासी प्रवास करतात. दरमहा प्रवासी सेवेतून उपक्रमाला १ कोटी ८० लाखाचा महसूल मिळतो. नवीन बससाठी लागणारा १०० चालक व ४५० वाहक वर्ग उपलब्ध करून देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे टेकाळे यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.

बसचा वाढता ताफा विचारात घेऊन कल्याणमधील वसंत व्हॅली, खंबाळपाडा येथील आगारांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. परिवहन भवनचा उपक्रमाने विचार केला आहे. प्रवासी सेवेचे विकेंद्रीकरण व सुलभ परिवहन सेवेसाठी विठ्ठलवाडी, गणेशघाट या आगारांचा विकास करण्यात येणार आहे.

सोलार बस थांबा उभारणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. गर्दीच्या वेळेत महिलांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर तात्काळ बस मिळावी म्हणून महिला विशेष बससेवा कल्याण, डोंबिवलीत सुरू करण्याचा मनोदय टेकाळे यांनी व्यक्त केला आहे.

दृष्टिक्षेपात केडीएमटीचा अर्थसंकल्प

  • जुन्या ११० बसपासून २६ कोटी ५३ लाखाचे उत्पन्न अपेक्षित.
  • नव्याने दाखल होणाऱ्या १७५ पासून चालू आर्थिक वर्षांत ७२ कोटी १० लाखाचे उत्पन्न अपेक्षित.
  • विवाह व अन्य सोहळ्यांसाठी स्टॅन्डर्ड बसचे भाडे दिवसभर १४ हजार रुपये.
  • मिडी बसचे भाडे १० हजार रुपये.
  • कर्मचारी, ठेकेदार देण्यांपोटी ६७ कोटी ४९ लाखाची तरतूद.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmt new bus service
First published on: 16-02-2017 at 02:22 IST