ठाणे : नसरापूर येथील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी आता संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी होत असतानाच, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे तथा ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनीही संताप व्यक्त केला. तसेच, राज्य सरकारविरोधात कठोर टीका केली.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे हे ठाण्यामध्ये जनता दरबार भरवून नागरिकांना त्यांच्या परीने न्याय देत असत. आनंद दिघे यांच्या निधनानंतर आजही ठाण्यात या जनता दरबाराच्या आठवणींचा उजाळा ठाणेकर देत असतात. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे ठाकरे गटात ठाणे जिल्हाप्रमुख या पदावर आहे. नसरापूर येथील घटनेनंतर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. केदार दिघे म्हणाले की, नरसापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र संतापाने पेटून उठला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात माय-लेकी सुरक्षित नसतील, तर हे प्रशासनाचे सर्वात मोठे अपयश आहे. केवळ आरोपीला अटक करून किंवा सांत्वनपर भेटी देऊन हे सत्र थांबणार नाही.
तसचे त्यांनी काही मागणी देखील केल्या आहेत. नरसापूरच्या त्या नराधमाला कोणत्याही तांत्रिक विलंबाशिवाय भरचौकात फाशीची शिक्षा द्या किंवा त्याला अशा स्वरूपाची शिक्षा द्या की भविष्यात कोणाचीही अशी कृती करण्याची हिंमत होणार नाही. गृह मंत्रालय आणि महिला आयोगाने आतापर्यंत “आम्ही हे करतोय, ते करतोय” असे सांगत केवळ बैठका आणि चर्चा केल्या आहेत. आता कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक निर्माण करण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले.
गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करण्यासाठी गृहविभागाने कायदा आणि सुव्यवस्था सक्षम करून खऱ्या अर्थाने क्रांती घडवावी. जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून महिनाभराच्या आत निकाल लावून गुन्हेगारांना फासावर लटकवावे. प्रत्येक शाळेत, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही आणि सक्षम पोलीस यंत्रणा तैनात असावी अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने कृतीवर भर द्यावा
महाराष्ट्र आता केवळ विचार आणि विनिमय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आमच्या लेकी-बाळींच्या सुरक्षिततेसाठी सरकारने आता शब्दांपेक्षा कृतीवर भर द्यावा. जर नराधमांना कठोर शासन झाले नाही, तर जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला.
