scorecardresearch

जिल्हा कृषी विभागातर्फे खरिपाचे नियोजन सुरू; खत, बियाणांच्या विक्री आणि वितरणासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

जिल्हा कृषी विभागातर्फे आगामी खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

ठाणे : जिल्हा कृषी विभागातर्फे आगामी खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी येत्या खरीप हंगामात खतांची आणि बियाणांची विक्री आणि वितरणासंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे याबद्दल कोणतीही अडचण येणार नाही यासाठी कृषी विभागाने सतर्क राहण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
यंदाच्या २०२२-२३च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ५६ हजार हेक्टर भात पिक, नागलीसाठी ७०८१.६५ हेक्टर, इतर तृणधान्यासाठी ३८३५.५० हेक्टर, उडीदसाठी २०० हेक्टर, मुगासाठी १०० हेक्टर, तुरीसाठी १० हजार हेक्टर, कडधान्य पिके ५० हेक्टर आणि गळीत धान्य १०० हेक्टरवर लागवड करण्याचे जिल्हा कृषी विभागातर्फे नियोजन करण्यात आले आहे.
जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून एक ते दोन महिने आधी तयारी सुरू करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाने देखील तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी पिकांच्या नियोजनाची पूर्वतयारी करण्यास सुरवात केली आहे. या संदर्भात उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसमवेत कृषी विभागाने खरीप हंगामासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकी दरम्यान खरीप हंगामात येणाऱ्या अडचणी, खते, बियाणे यांचे नियोजन, खतांचा शिल्लक साठा, युरियाचा वापर, आपले सरकार पोर्टलवर करावयाची नोंदणी, कृषी ॲप वापर मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. तसेच खतांची विक्री व वितरणासंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्याचे आदेशही ठोंबरे यांनी दिले.
सहा भरारी पथके
जिल्हा प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खत साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर खतांचा काळाबाजार, जादा दराने विक्री, साठेबाजी, बोगस खतांची विक्री आणि वितरणावर संनियंत्रण ठेवणे यासाठी कृषी विभागातर्फे जिल्हा स्तरावर आणि तालुकास्तरावर प्रत्येकी एक अशी एकूण सहा भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kharif planning district agriculture department establishment control room sale and distribution fertilizers seedamy