कल्याण – कल्याणमधील संतोषी माता रस्ता भागात ॲच्युव्हर्स महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर दोन बेशुध्द केलेल्या दुधाळ गाई महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या गस्ती पोलिसांच्या जागरूकतेमुळे एका टेम्पोतून जप्त करण्यात आल्या आहेत. दोन दिवसापूर्वी पोलीस संतोषी माता रस्ता भागात पहाटेच्या वेळेत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोतून खडखड आवाज येत असल्याचे लक्षात आले. पोलीस त्या टेम्पोच्या दिशेने जाताच त्या टेम्पोचा चालक पळून गेला. टेम्पोत बेशुध्द केलेल्या बांधून ठेवलेल्या दुधाळ जर्सी गाई आढळल्या.

गस्ती पोलिसांनी तातडीने आपले वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक आश्लेषा घाटगे यांना ही माहिती दिली. त्या तातडीने पंच घेऊन घटनास्थळी दाखल झाल्या. पशु वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मजुरांच्या साहाय्याने या गाईंची टेम्पोतून जखडलेल्या अवस्थेमधून सुटका करण्यात आली. त्यांच्यावर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ उपचार सुरू केले.

काही वेळाने या जर्सी गाई शुध्दीवर आल्यावर त्यांना चारा, पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. आणि त्या योग्य ठिकाणी नेऊन बांधण्यात आल्या.या गाई कत्तल करण्यासाठी अज्ञातांनी चालविल्या होत्या, याची खात्री पटल्यावर पोलिसांनी या टेम्पोचा फरार चालक आणि या गाईंना चोरून आणून त्यांना बेशुध्द करून कत्तलीसाठी नेणाऱ्या इसमा विरूध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात हवालदार राजाराम मोहंडुळे यांच्या तक्रारीवरून प्राणी छळ प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही जर्सी गाईंची बाजारातील किंमत सुमारे ३० हजार रूपये पोलिसांना समजली. ६० हजार रूपये किमतीच्या या दोन्ही गाई आहेत. टेम्पोची किंमत साडे चार लाख रूपये आहे. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण पाच लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हवालदार सुकालाल चौधरी या कारवाईत सहभागी झाले होते.

हवालदार मोहंडुळे, चौधरी या टेम्पोच्या जवळ आले नसते तर अज्ञात इसमांना या गाईंची हालचाली समजली नसती. या गाईंना अन्य ठिकाणी नेण्यात आले असते. शहापूर, मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागात रात्रीच्या वेळेत काही अज्ञात व्यक्ती गाई, बैल चोरण्यासाठी फिरतात. गाईंना दूरवरून इंजेक्शन फेकून बेशुध्द केले जाते. मग ही गाई, बैल टेम्पो, मोटार कारमध्ये भरून ती कल्याण दिशेने आणली जातात. काही हिंदु संघटनांचे पदाधिकारी या वाहतुकीवर बारकाईने नजर ठेऊन असतात. त्यांच्या असे टेम्पो नजरेत पडले की ते तात्काळ त्या वाहनाचा पाठलाग करून पोलिसांच्या साहाय्याने ते टेम्पो अडवून त्यामधील प्राण्यांची सुटका करून घेतात. आणि या प्राण्यांना पकडून आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना भाग पडतात. अशा प्रकारचे अनेक गुन्हे कल्याणमधील पोलीस ठाण्यात दाखल आहेत.