scorecardresearch

वैद्यकीय महाविद्यालयात सोसायटीचा खोडा?; पर्यायी जागेचा विचार करण्याची शेतकी सोसायटीची मागणी

अंबरनाथ पूर्वेतील अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटीच्या जागेवर होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आरक्षण बदलाच्या निर्णयाला खुद्द शेतकी सोसायटीच्या सदस्य आणि समितीनेच हरकत नोंदवली आहे.

प्रतिनिधीक छायाचित्र

सागर नरेकर
अंबरनाथ: अंबरनाथ पूर्वेतील अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटीच्या जागेवर होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आरक्षण बदलाच्या निर्णयाला खुद्द शेतकी सोसायटीच्या सदस्य आणि समितीनेच हरकत नोंदवली आहे. अनेक वर्षांपासून राखलेला भूखंड असा महाविद्यालयाला देणे हे सदस्य, सोसायटी आणि पर्यावरणावर अन्याय करण्यासारखे आहे. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करून दुसऱ्या भूखंडाचा शोध घ्यावा, अशी मागणी सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे.
अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटीला १९६४ साली महाराष्ट्र शासनाने सव्‍‌र्हे क्रमांक १६६ मधील सुमारे २१० एकर जागा शेती आणि शेतीपूरक उद्योगासाठी दिली होती. या सोसायटीच्या जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यासाठी संस्थेच्या मालकीच्या सव्‍‌र्हे क्रमांक १६६ मधील अंदाजे ११ हेक्टर इतके क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाकरिता आरक्षित करण्याची कार्यवाही एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी २२ मार्चपासून सूचना आणि हरकती नोंदवण्याचे आवाहन एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्याची मुदत नुकतीच संपली आहे.
अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटीच्या वतीने या आरक्षण बदलावर हरकत घेण्यात आली असून ही प्रक्रिया तातडीने थांबवून महाविद्यालयाच्या जागेसाठी दुसऱ्या जागेचा शोध घ्यावा, अशी मागणी शेतकी सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे. सोसायटीच्या वतीने एक आणि इतर सोसायटी सदस्यांनी जवळपास ४५ हरकती नोंदवण्यात आल्याची माहिती सोसायटीच्या वतीने देण्यात आली आहे. या वेळी सोसायटीच्या वतीने सहा मुद्दय़ांवर बोट ठेवून या महाविद्यालयासाठी ही जागा वापरण्याला विरोध केला आहे. तसेच शेतकी सोसायटीच्या भूखंडांवरील अतिक्रमण हटवण्यास स्थानिक पालिका प्रशासन प्रतिसाद देत नसून आमच्या जागांवर अतिक्रमण होत असताना आणखी एक जागा देणे परवडणारे नाही, अशी भूमिका शेतकी सोसायटीच्या वतीने घेण्यात आली आहे. त्यामुळे हिरवेगार भूखंड अशा कामासाठी वापरण्यापेक्षा इतर जागांचा शोध घ्यावा, अशी मागणी सोसायटीने केली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या उभारणीत अडथळा येण्याची भीती व्यक्त होते आहे.
हरकतीतील मुद्दे
उच्च न्यायालयाच्या एका प्रकरणात न्यायालयाने स्थगिती आदेश दिला असून त्यामुळे आरक्षण बदलाची कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरू शकतो. ही जमीन शेती आणि शेतीपूरक उद्योगांसाठी असून त्यामुळे सोसायटीचे भूखंडाचे संरक्षण केले आहे. आवश्यक जमिनीवर ४० सदस्य कार्यरत असून त्यांच्यावर अन्याय होईल. यापूर्वी १९८७ ला तत्कालीन कल्याण महापालिकेला मागणीनंतर शिवमंदिर परिसरातील भूखंड दिला. त्यावर आता अतिक्रमण आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान झाले आहे.
पालिकेच्या दुर्लक्षामुळे सोसायटीच्या काही जागा अतिक्रमणात अडकल्या आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने या जागा अबाधित राखणे आवश्यक आहेत. मात्र अचानक जागा काढून घेणे ही बाब चुकीची आहे. आम्ही हरकत नोंदवली असून त्यावर सखोल सुनावणीची मागणी केली आहे. – विश्वास म्हस्के, अध्यक्ष, अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटी.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही जिल्ह्याची गरज आहे. जागेचा वापर शासकीय वापरासाठी असून जागा ही महाराष्ट्र शासनाची आहे. त्यावर कुणाला हरकत असू नये. त्याच्या उभारणीत काही अडचणी येतील असे वाटत नाही. एमएमआरडीए नियमानुसार प्रक्रिया करेल. – डॉ. बालाजी किणीकर, आमदार, अंबरनाथ.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Khoda society medical college demand farming society consider alternative place ambernath cooperative community amy

ताज्या बातम्या