डोंबिवली : डोंबिवलीजवळील काटई-बदलापूर रस्त्यावरील खोणी-पलावा व आसपासच्या परिसरात झालेल्या प्रचंड नागरीकरणामुळे या भागातील लोकसंख्या सुमारे अडीच लाखांच्या घरात पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून पोलीस चौकी उभारून केवळ दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपुऱ्या पोलीस बळामुळे स्थानिक नागरिकांना, या रस्त्यावरून नियमित येजा करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या सुरक्षेच्या समस्येला तोंड द्यावे लागत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काटई ते बदलापूर रस्त्यावर, खोणी ते तळोजा रस्त्यावर दिवसा, रात्री अनेक भुरटे चोर, दुचाकी स्वारावर, मोटारीवर अंडी फेकून, त्याच्या मार्गात अडथळे आणून चालकाचे विचलित करून त्यांना लुटण्याचे प्रकार करतात. हा भाग निर्जन पडत असल्याने चालकाल लुटले जात असताना याठिकाणी कितीही ओरडा केला तरी या रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणीही नागरिक चालक, प्रवाशांच्या बचावासाठी पुढे येत नाही. त्यामुळे या भागातील पोलीस चौकीत २४ तास पोलीस तैनात असणे आवश्यक असताना, खोणी पलावा भागातील पोलीस चौकी कायमस्वरूपी बंद राहत असल्याने या भागातील रहिवासी, प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.

या परिसरातील रहिवाशांना कोणतीही लहान-मोठी पोलीस तक्रार नोंदवायची असल्यास वा या रस्त्यावर काही अपघात घडला असल्यास, काही आपत्कालीन मदत हवी असल्यास १२ किलोमीटर दूर असलेल्या मानपाडा पोलीस ठाण्यात जावे लागते. पोलीस ठाण्यात जाताना शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते.

ऐनवेळी पोलीस ठाणे गाठणे सामान्य नागरिकांसाठी अत्यंत कठीण जात असून, यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. किरकोळ वादावादी किंवा चोऱ्यांच्या घटना घडल्यास पोलीस वेळेत पोहोचू शकत नसल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढत चालल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

स्वतंत्र पोलीस ठाणे

अडीच लाख लोकसंख्येचा भार केवळ दोन पोलिसांवर टाकणे म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे. या समस्येमुळे पलावा-खोणी परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या समस्येची त्वरित दखल घेऊन खोणी-पलावा परिसरात तात्काळ स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करावे आणि पुरेसे पोलीस बळ उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी या भागातील सामाजिक कार्यकर्ते महेश ठोंबरे, शंकर जगताप, सर्वेश पावसकर, जॉय ऑगस्टीन यांनी केली आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, खोणी पलावा भागातील पोलीस चौकीत पोलीस बळ उपलब्ध नसले तरी या भागात आमची सतत गस्त असते. उपलब्ध पोलीस बळ कमी असल्याने या भागात कायमस्वरूपी पोलीस नियुक्त करण्यात अडचणी आहेत.

खोणी पलावा परिसराच्या नियंत्रक शासन संस्थांना कोट्यवधीचा मालमत्ता कर या भागातील नागरिकांकडून वेळेवर मिळतो. मग या भागात मूलभूत सुविधा देण्यात टाळाटाळ, तसेच पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आम्हाला १२ किमी दूर का जावे लागते, असे प्रश्न नागरिक करत आहेत. हक्काच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने खोणी पलावा भागातील नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.- योगेश पाटील, अध्यक्ष, खोणी पलावा ऑर्किड सोसायटी.