डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकाचा अपहृत मुलगा सुरत मध्ये सापडला |kidnapped son of businessman from dombivli midc found in Surat police crime | Loksatta

डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकाचा अपहृत मुलगा सुरत मध्ये सापडला

सलग चार दिवस डोंबिवली, कल्याण, नाशिक, जव्हार, गुजरात, सुरत मधील सुमारे ३०० पोलीस एकावेळी या मुलाच्या सुटकेसाठी अहोरात्र मेहनत घेत होते.

डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकाचा अपहृत मुलगा सुरत मध्ये सापडला
डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकाचा अपहृत मुलगा सुरत मध्ये सापडला

डोंबिवली: चार दिवसापूर्वी डोंबिवली एमआयडीसीतून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या एका १२ वर्षाच्या शाळकरी मुलाची सुरत (गुजरात) येथून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका करण्यात डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांना शनिवारी यश आले. बुधवारी सकाळपासून ते शनिवारी दुपारपर्यंत सलग चार दिवस डोंबिवली, कल्याण, नाशिक, जव्हार, गुजरात, सुरत मधील सुमारे ३०० पोलीस एकावेळी या मुलाच्या सुटकेसाठी अहोरात्र मेहनत घेत होते.

खंडणी दिली नाही तर अपहरणकर्ते मुलाच्या वडिलांना मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी मोबाईलवरुन सतत देत होते. हा विषय अतिशय संवेदनशील बनला होता. कोणत्याही परिस्थितीत मुलाल आरोपींच्या तावडीतून सुखरुप सोडविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मुलाचे वडील उद्योजक असल्याने त्यांच्याकडून आपली खंडणीची मागणी पूर्ण होईल असा विश्वास अपहरणकर्त्यांना होता. पोलिसांनी तांत्रिक कौशल्य शिताफिने वापरुन मुख्य आरोपीच्या सुरत मधील घरात छापा मारुन अपहृत मुलासह पाच आरोपींना ताब्यात घेतले.

हेही वाचा: ‘ती’ चित्रफीत प्रसारित करत खोटा गुन्हा नोंदविला; जितेंद्र आव्हाड यांची समाजमाध्यमांवरील पोस्ट चर्चेत

आरोपींची नावे
मुख्य आरोपी फरदशहा फिरोजशहा रफाई (२६, पालघर, मूळ निवासी गुजरात, राजकोट), प्रिंसकुमार रामनगिना सिंग (२४, भावनगर, गुजरात), शाहीन शाबम मेहतर (२७, राजकोट), फरहीन प्रिंसकुमार सिंग (२०, फरदशहाची बहीण), नाझिया फरदशहा रफाई (२५, पत्नी).

अपहरणाची घटना
रंजीत सोमेंद्र झा (४५) यांची डोंबिवली एमआयडीसीत कंपनी आहे. ते उद्योजक आहेत. पत्नी, तीन मुलांसह एमआयडीसी निवासी भागात राहतात. त्यांचा रुद्रा (१२) मुलगा इयत्ता सातवीत माॅडेल इंग्लिश शाळेत शिक्षण घेतो. तो नियमित मिलापनगर मधील एका खासगी शिकवणीसाठी सकाळी आठ वाजता पायी जातो. सकाळी १० वाजता पायी एकटाच घरी येतो. बुधवारी (ता.९) सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे तो एकटाच पायी शिकवणीसाठी गेला. तो नेहमीप्रमाणे घरी आला नाही. उद्योजक रंजीत झा, पत्नी कामिनी, दोन मुले खासगी शिकवणी वर्ग होत असलेल्या सोसायटीत गेले. शिकवणी वर्ग बंद झाले होते. त्यांनी एमआयडीसी परिसरात रुद्राचा शोध घेतला. तो आढळून आला नाही. रुद्राचा शोध सुरू असताना वडील रंजीत यांना एक अनोळखी इसमाचा फोन आला. त्यांनी प्रतिसाद दिला. समोरुन मुलगा रुद्रा वडिलांना ‘माझे काही लोकांनी अपहरण केले आहे’ असे सांगितले. तेवढे बोलणे झाल्यानंतर अपहरणकर्त्यांनी स्वताकडे मोबाईल घेऊन ‘आम्ही तुमच्या मुलाचे अपहरण केले आहे. दोन दिवसात एक कोटीची खंडणी द्या नाहीतर मुलाला ठार मारु’ अशी धमकी दिली. उद्योजक रंजीत यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना घडला प्रकार सांगितला. ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंग यांच्या आदेशावरुन गुन्हे शाखेचे सर्व वरिष्ठ, कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली, कल्याण मधील पोलिसांची २० तपास पथके तयार करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षकांची सहा स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.

हेही वाचा: डोंबिवली: रस्त्यांची कामे सुरू होताच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लावले मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे फलक

घटनेचा माग

बुधवारी मुलगा घर ते शिकवणी वर्गात गेला त्या मार्गावरील सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी तपासले. वडील रंजीत यांना यांना आरोपींकडून आलेल्या मोबाईलचा तांत्रिक माग पोलिसांनी काढला. आरोपींनी निस्सान कंपनीची दॅटसन गो हे वाहन अपहरणासाठी वापरले असल्याचे दिसले. डोंबिवलीतून वाहन बदलापूर, खडवली, जव्हार मार्गे नाशिककडे गेल्याचे आढळले. नाशिक, जव्हार, मोखाडा परिसर पोलिसांनी पिंजून काढला. वाहन सीसीटीव्हीत दिसून नये म्हणून आरोपी आडमार्ग, जंगल मार्गाचा वापर करत होते. ते वाहन क्रमांक सतत बदलत होते. नाशिक, जव्हार परिसरात पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ पथकासह नाकाबंदी करुन वाहने तपासत होते. गुरुवारी (ता.१०) आरोपींनी रंजीत यांना संपर्क करुन ‘तुम्हाला खंडणी द्यायची नाही का. आता दीड कोटी येत्या तीन तासात द्या अन्यथा मोठी किमत तुम्हाला चुकवावी लागेल’ असा इशारा दिला. झा कुटुंबीय चिंताग्रस्त होते.

जंगलात पळ काढला
वरिष्ठ निरीक्षक अशोक होनमाने जव्हार, मोखाडा भागात गस्तीवर असताना त्यांना आरोपींचे वाहन काही अंतरावरुन सुसाट गेल्याचे दिसले. त्यांनी समोरीला पथकाला वाहन अडविण्याच्या सूचना दिल्या. आरोपींनी गस्ती पथकावर वाहन घालून वाहन पुढे नेले. तेथील जंगलात वाहन सोडून रुद्रासह जंगलात पसार झाले. पथकांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगल परिसर पिंजून काढला. आरोपींना पकडणाऱ्यांना ५० हजाराचे बक्षिस लावण्यात आले. अंधार झाल्याने आरोपी जंगलातून पसार झाले. वाहनामध्ये सुरा, रुद्राची वही, चप्पल आढळली. या वाहनावरुन या कटाचा मुख्य सूत्रधार फरदशहा फिरोजशहा रफाई असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी पालघरच्या जंगलातून गुजरात दिशेने पळाले असल्याचे तांत्रिक विश्लेषणात दिसले. पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद मार्ग, तलासरी आच्छाड नाका येथे तपास सुरू केला. आरोपी फरदशहा पालघर येथे राहत असला तरी मुळचा तो सुरत राजकोट येथील रहिवासी आहे. गुजरात, सुरत पोलिसांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झाली.

हेही वाचा: ठाणे, कळवातील पुलांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, विकासकामांवरुन श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्हे

सामानाच्या टेम्पोमुळे माग
फरदशहा याने पालघर मधील घरातील सामान रात्रीतून एका टेम्पोने सुरतमधील आपल्या घरी पाठविले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी महाराष्ट्र वाहन क्रमांक असलेले गुजरात, सुरत मध्ये आलेले टेम्पो तपासले. त्यात एक टेम्पो चालक ताब्यात घेतला. त्याने फरदशहाचा सुरत मधील घराचा पत्ता दिला. साध्या वेशातील पोलिसांनी जाऊन घराची टेहळणी केली. एकावेळी ५० हून अधिक पोलिसांच्या पथकाने फरदशहाच्या घरात छापा टाकला. दोन पुरुष, तीन महिला आरोपी अपहृत रुद्रासह लपून बसले होते. पोलिसांनी पहिले रुद्राला सुखरुप ताब्यात घेऊन आरोपींना जागीच अटक केली. या कामगिरीबद्दल तपास पथकाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-11-2022 at 16:10 IST
Next Story
ठाण्यात कळवा खाडी पुलाच्या लोकार्पणाआधी श्रेयाची अहमामिका; राष्ट्रवादी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात श्रेयवाद रंगला