scorecardresearch

“राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकण्याची सुपारी संजय पांडेंनी घेतली होती का?”; किरीट सोमय्यांचा सवाल

ठाणे महानगरपालिकेतील घोटाळे उघड करण्यासाठी भाजपा काळी पुस्तिका काढणार असल्याचंही सोमय्या म्हणाले.

“मनसुख हिरेन यांचं कुटुंब आता थोड स्थिरावलं आहे. त्यांच्या मी चर्चा केली, त्यानंतर ते ठीक आहेत. मनसुख हिरेन वसुलीखोर असल्याचे चित्र ठाकरे सरकारने तयार केले होते, त्यामुळे हिरेन कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागला होता. दरम्यान, वाझेंना आणि प्रदीप शर्मा यांना पुन्हा पोलीस दलात आणणाऱ्यांची चौकशी केली पाहिजे. पुढच्या आठवड्यात मी एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटणार असून आता एकच चार्जशीट दाखल झाली आहे, यापुढे अजून होऊ शकतात, हिरेन प्रकरणात कोण कोणते अधिकारी होते ते उघड करणार,” असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.  

दरम्यान, “राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊच शकत नाही. आता ज्याने हा गुन्हा लावला त्यावर कारवाई होणार ना?, त्यामुळे संजय पांडे आणि दिलीप वळसे पाटील यांनी आता उत्तर द्यावे. नवनीत आणि रवी यांना आत टाकण्याची सुपारी संजय पांडे यांनी घेतली होती का? नगराळे यांची बदली का केली गेली?,” असे अनेक प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केले.

“गेली अनेक वर्षे माफिया सेना या ठाणे महापालिकेत सत्तेत आहे. अनेक वर्ष घोटाळे झाले, आता गेल्या पाच वर्षात जे घोटाळे झाले, त्याची एक काळी पुस्तिका भाजपा काढणार आहे. मुंबई प्रमाणे ठाण्यात देखील पोलखोल सभा होणार आहे. ५० प्रकारचे घोटाळे आहेत, ते सर्व नागरिकांसमोर आम्ही आणू,” असा इशारा त्यांनी दिला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kirit somayya questions sanjay pande role in rana couple custody hrc

ताज्या बातम्या