ठाणे : वागळे इस्टेट येथील किसननगर भागातील नागरिकांना पनवेलपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन सेवा महामंडळाने (एसटी) किसननगर ते पनवेल ही बसगाडी सेवा सुरू केली आहे. किसननगर, वागळे इस्टेट भागात रायगड, पनवेल आणि कोकण भागातील हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
किसननगर येथून राज्य परिवहन सेवेची बसगाडी पनवेलपर्यंत उपलब्ध व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यामुळे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी यासंदर्भाचा पाठपुरावा एसटी महामंडळाकडे केला होता. त्यानुसार, एसटी महामंडळाने किसननगर ते पनवेल ही बसगाडी सुरू केली आहे. वागळे इस्टेट, किसननगर, लोकमान्यनगर भागात कोकणातील नागरिक मोठ्याप्रमाणात वास्तव्यास आहे. ही बसगाडी सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा – ठाणे : रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्यपूर्ण संवाद ठेवण्याचे सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण
बसगाड्यांचे वेळापत्रक
किसननगरहून पनवेल – सकाळी ८, ११.२०, दुपारी ३.५५, सायंकाळी ७.१५.
पनवेलहून किसननगर – सकाळी ९.४०, दुपारी १.२०, सायंकाळी ५.३५, रात्री ९.१५.