पाऊले चालती.. : जंगलाचे आणि खाडीचे देणे | Loksatta

पाऊले चालती.. : जंगलाचे आणि खाडीचे देणे

कोलशेत खाडीकिनारी चौपाटी विकसित करण्यात येत असल्याने या भागाचे महत्त्व आता खूप वाढले आहे.

पाऊले चालती.. : जंगलाचे आणि खाडीचे देणे
कोलशेत खाडीकिनारी चौपाटी विकसित करण्यात येत असल्याने या भागाचे महत्त्व आता खूप वाढले आहे.

कोलशेत खाडीकिनारा, ठाणे (प)

नव्वदच्या दशकात हळूहळू ठाणे विस्तारू लागले आणि परिघावरील गावठाणांनी आपला चेहरा बदलला. तरीही अनेक गावांनी आपले मूळ अस्तित्व काही प्रमाणात का होईना टिकवून ठेवले आहे. कोलशेत त्यापैकी एक. भातशेतीच्या सानिध्यात उभारलेल्या टॉवरमधील नवे ठाणेकर सकाळी फेरफटका मारण्यासाठी खाडीकिनारी येतात.

कोलशेत खाडीकिनारी चौपाटी विकसित करण्यात येत असल्याने या भागाचे महत्त्व आता खूप वाढले आहे. अनेक नवनवीन गृहप्रकल्प इथे उभारले जात आहेत. याच ठिकाणी जलवाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार असून त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीही होणार आहे. तूर्त परिसरातील नागरिक मोठय़ा प्रमाणात सकाळ-संध्याकाळी मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी इथे येत आहेत.

पहाटे लवकर अगदी पाच वाजता येथे नागरिकांचा राबता सुरू होतो. खाडीच्या पाण्यावर सूर्यकिरण पडून ते परावर्तित होतात. त्यामुळे हा सर्व परिसर लखलखून निघतो. अक्षरश: सोनेरी सकाळ म्हणजे काय याचा अनुभव नागरिकांना घेता येतो. त्यामुळे हे नयनरम्य दृश्य अनुभवण्यासाठी अनेक जण आवर्जून येतात. त्याचप्रमाणे येथील शुद्ध हवेत योगसाधना आणि हलका व्यायाम करण्यासाठीही बरेच लोक येत असतात. कोलशेत, ढोकाळी, मनोरमा नगर, हायलँड, मानपाडा परिसरांतील नागरिकांना कोलशेत खाडी परिसर म्हणजे निसर्गाचे लाभलेले वरदान आहे. तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक असे सर्व वयोगटांतील नागरिक येथे येतात. कोलशेत रस्त्यालगत वेगवेगळ्या प्रजातींची झाडे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला हा परिसर लागून असल्याने अनेकदा वन्यप्राण्यांचेही दर्शन रहिवाशांना घडते. या भागात बिबटय़ाचाही वावर असतो. त्याच्या पायाचे मिळणारे ठसे हा त्याचा पुरावा आहे. सदाहरित जंगल, जवळपास औद्योगिक वसाहत नाही. वाहनांची ये-जा नाही. त्यामुळे या परिसरात प्रदूषण नाही. त्यामुळे शहरात राहूनही खेडय़ात राहिल्याचा भास होतो. या परिसरात निरनिराळे वैशिष्टय़पूर्ण पक्षी आढळतात. त्यामुळे त्यांचे निरीक्षण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पक्षिमित्रही या भागात येत असतात.

शहरात आता मोकळ्या जागा फारशा शिल्लक नाहीत. मैदाने एक तर नाहीशी अथवा आकुंचित होत आहेत. इथे मात्र मोठी मोकळी जागा आहे. त्यामुळे खेळण्यासाठी अनेक तरुण इथे येतात. पालिका प्रशासनाने ‘ओपन जिम’ची सुविधा दिली आहे. त्याचाही नागरिक वापर करतात. कोलशेत मार्गावरील खड्डय़ांमुळे मात्र रहिवाशांना त्रास होतो. अवघ्या चार-पाच महिन्यांत नव्याने बनविलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तातडीने रस्त्याची डागडुजी व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

येत्या काही वर्षांत खाडीकिनाऱ्याचे चौपाटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यातील नवे पर्यटनस्थळ म्हणून याचा विकास होईल. सध्या येथे फार मोठे गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे परिसरातील लोकसंख्याही वाढू लागली आहे.

इथे आल्यावर ताजेतवाने वाटते. थकवा जाणवत नाही. इथल्या शुद्ध हवेत काही काळ फिरल्याने दिवसभराची ऊर्जा मिळते.

– डॉ. मिलिंद रणदिवे 

सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी इथे सूर्याचे अद्भुत दर्शन घडते. अनेक जण हे दृश्य अनुभविण्यासाठी बाहेरगावी जातात. आमचे हे भाग्य आहे की ते दृश्य आम्ही इथे दररोज पाहू शकतो. कोलशेत प्रभातफेरी स्थळ खरेच छान आहे. मात्र या रस्त्यावरील खड्डय़ांचे विघ्न दूर व्हायला हवे. महापालिका प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी, अशी आमची अपेक्षा आहे.

– संजय जाधव

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-08-2017 at 02:49 IST
Next Story
शहरबात-कल्याण-डोंबिवली : गॅरेजचा विळखा