ठाणे : कोलशेत येथील एका मोठ्या गृहसंकुलात आयोजित करण्यात आलेल्या हॅलोविन पार्टीत किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये हाणामारी झाली. या मारहाणीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याच्या गळ्यातील चांदीची साखळीही गहाळ झाली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोलशेत येथील एका गृहसंकुलात ३१ ऑक्टोबर रोजी हॅलोविन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीची जाहिरात आयोजकांनी इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर केली होती. पार्टीसाठी प्रतीव्यक्ती ५०० रुपये शुल्क आकारण्यात येत होते. ठाण्यातील विविध भागांमध्ये या पार्टीची जाहिरात प्रसारित झाल्याने अनेक तरुण-तरुणींनी त्यात सहभाग घेतला होता.
तक्रारदार १७ वर्षीय अल्पवयीन मुलगाही त्याच्या मित्रांसह या पार्टीला गेला होता. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास तो पार्टीच्या ठिकाणी पोहोचला. पार्टीमध्ये मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाल्याने प्रवेशद्वारावर गर्दी झाली होती. काही तरुण बाऊन्सरला धक्काबुक्की करून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.
याचवेळी एका तरुणाचा पाय प्रवेशद्वाराच्या दरवाजात अडकला. तक्रारदाराने दरवाजा ओढल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा संशय संबंधित तरुणाला आला. त्यावरून त्याने आपल्या काही मित्रांना बोलावले. या तरुणांनी पार्टीच्या ठिकाणी येऊन तक्रारदाराला पकडले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तक्रारदाराच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला.
तसेच, त्याच्या गळ्यातील चांदीची साखळीही पडून गहाळ झाली. त्याच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी मानपाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी विचारणा केली असता, स्लाईड लागल्याने दुखापत झाल्याचे त्याने सांगितले. मात्र, नातेवाईक रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी विचारणा केली असता, त्याने पार्टीत झालेल्या मारहाणीचा प्रकार सांगितला. त्यानंतर याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
