तरुणाईचे गच्ची, रिसॉर्ट, फार्महाऊसमध्ये पाटर्य़ाचे बेत
नववर्षांचे स्वागत जल्लोशात व्हावे या दृष्टीने प्रत्येक जण उत्साही असून निसर्गाच्या सान्निध्यात, थंड हवेच्या ठिकाणी जाऊन नव्या वर्षांचे स्वागत करण्याची पद्धत आता वाढीस लागली आहे. त्यामुळे या विकेण्डला ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील अनेक कुटुंबे कोकण, गोवा, महाबळेश्वर आणि माथेरानच्या सहलींची आखणी करून त्या भागात दाखल झाली आहेत. तर लांबचा प्रवास नको वाटणाऱ्या तरुणाईचा कल शहराबाहेरली रिसॉर्ट किंवा फार्म हाऊसवर नववर्ष सेलिब्रेट करण्याचा दिसून येत आहे. घरच्या गच्चीवर किंवा सोसायटीमधील एका मित्राच्या घरीच रात्रीच्या पाटर्य़ाचा बेत आखून नववर्ष साजरे करण्याचे निर्णयही घेतले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकण, गोवा आणि महाबळेश्वर
एकीकडे कोकण, गोव्यातील विस्तीर्ण समुद्रकिनारा तर दुसरीकडे महाबळेश्वरच्या निमित्ताने अनुभवता येणारा सह्य़ाद्रीचे गगनचुंबी रूप या दोन्ही ठिकाणाची भुरळ मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या परिसरातील नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे सहलींना जाऊन नव्या वर्षांचे स्वागत करण्याचा कल अनेक कुटुंबांमध्ये रुजू लागला आहे. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने गोव्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये मुंबई आणि ठाण्यातील प्रवाशांचा टक्का दिवसेंदिवस वाढत असल्याचे तेथील ट्रॅव्हल कंपनीचे राजू चारी सांगतात. गोव्यामध्ये सध्या सामान्य थंडी असून समुद्राच्या ओढीने अनेक मंडळी येथे दाखल होत आहेत. गोव्याप्रमाणेच नववर्ष स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांनी कोकणही हाऊसफुल्ल झाले आहे. नववर्षांच्या स्वागताचा आनंद लुटण्यासाठी कोकणात हजारो पर्यटक येतील असा अंदाज येथील व्यवसायिकांकडून व्यक्त होत आहे. माथेरान, अंबोली आदी थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटकांनी मोठी पसंती दिली आहे. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरील गणपतीपुळे, हरिहरेश्वर, बोरडी, तारकरली, मुरुड-हर्णे, दापोली, पावस, हेदवी, वेळणेश्वर, परशुराम येथील ऐतिहासिक मंदिरे, लेणी, पर्यटकांना आकर्षित करणारे किल्ले, थंड हवेच्या ठिकाणांकडेही पर्यटकांचा विशेष ओघ पाहावयास मिळत आहे. ख्रिसमस आणि विकेण्ड लक्षात घेऊन कोकण रेल्वेच्या वतीने चार नव्या गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. या सगळ्या गाडय़ांचे आरक्षण फुल होऊ लागले आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावरील वाढील गर्दी कमी करण्यासाठी या गाडय़ा उपयुक्त ठरतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क विभागाचे सिद्धेश्वर तेलुगू यांनी दिली. तर नववर्षांसाठी महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्यांचेसुद्धा मोठे बुकिंग होत असल्याची माहिती के ट्रॅव्हल पॉइंटचे तुशार जाधव यांनी दिली.

माथेरान, लोणावळा आणि आलिबाग..
नव्या वर्षांच्या स्वागतासाठी माथेरान, लोणावळ आणि आलिबाग अशा मुंबई, ठाण्यापासून अवघ्या एका दिवसात ये जा करता येऊ शकेल अशा ठिकाणांची मोठी चलती आहे. यामध्ये माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ अधिक आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सेवेने नेरळ स्थानकात पोहचून तेथून मिनी ट्रेनची व्यवस्था असल्याने या ठिकाणाला विशेष पसंती मिळत आहे. १५ डिसेंबरपासून या भागात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमालीचा वाढला असून येथील हॉटेल्स, रिसॉर्टही फुल्ल झाले आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांसाठी हा सुगीचा महिना ठरला आहे. माथेरानबरोबरच लोणावळा, खंडाळा, अलिबाग, डहाणू याभागातील रिसॉर्ट, फार्महाऊन फुल झाले आहेत. तर दमण, भंडारदरा आणि सापुतारा या गुजराथकडील भागातही अनेकांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे एकूणच मुंबईबाहेरील ३१ डिसेंबरच्या पाटर्य़ाना रंगत येण्यास सुरुवात झाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan goa mahabaleshwar matheran trip for new year
First published on: 25-12-2015 at 02:43 IST