ठाणे – कोकणातील प्राचीन वारसा असलेल्या कातळशिल्पांना जागतिक पटलावर ठळकपणे स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या माध्यमातून कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जागतिक स्तरावर प्रभावी सादरीकरण होणार आहे.
रत्नागिरी परिसरातील सुमारे ३०० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीपैकी जवळपास २५ किलोमीटर परिसरात २००० हून अधिक कातळशिल्पे आढळून आली आहेत. हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी जीवनशैली, श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक रचनेचे प्रतिबिंब या शिल्पांमध्ये उमटलेले दिसते. त्यामुळे या कातळशिल्पांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तसेच त्यांचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण करण्यासाठी हा माहितीपट अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे मंत्री शेलार यांनी नमूद केले.
या माहितीपट निर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिग्दर्शक व सहाय्यक दिग्दर्शकांची नियुक्ती केली जाणार असून, व्यापक सर्वेक्षण, अत्याधुनिक चित्रीकरण तंत्रज्ञान, ड्रोन शूट, सिनेमॅटिक दृश्यांकन, उच्च-गुणवत्तेचे छायाचित्रण यांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक, निवास, स्टुडिओमधील एडिटिंग, साउंड डिझाइन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ‘बिहाइंड द सीन’ (बीटीएस) सामग्री तयार करण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे. माहितीपटातून तयार होणाऱ्या दृश्यसामग्रीच्या आधारे सोशल मीडियासाठी स्वतंत्र डिजिटल कंटेंट विकसित करण्यात येणार असून, कातळशिल्पांच्या वैभवाचे दर्शन घडविणारी एक समृद्ध ‘एव्ही कंटेंट बँक’ही उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत कातळशिल्पांचे विविध ऋतूंमध्ये, वेगवेगळ्या प्रकाशछटांमध्ये तसेच स्थानिक लोकजीवनाशी असलेल्या त्यांच्या नात्याच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरण करण्यात येणार आहे. हा माहितीपट युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार साकारला जाणार असून, त्याद्वारे जागतिक स्तरावर मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडे सोपविण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे कोकणातील कातळशिल्पांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळेल, तसेच पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असा विश्वास मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे जतन आणि जागतिक स्तरावर प्रसार करण्याच्या दृष्टीने हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
