Central Railway / ठाणे : २०२६ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कोकणात धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. हे बदल १२ जानेवारीपासून लागू होणार आहे. कोकण मार्गावर प्रवाशांचा मोठा ओघ असलेल्या दिवा–सावंतवाडी रोड–दिवा एक्सप्रेसच्या वेळापत्रकात हे बदल लागू करण्यात येणार आहेत.

कोकणात मुळ गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या बाराही महिने सर्वाधिक असते. ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, पनवेल याठिकाणी मोठ्यासंख्येने कोकणवासी राहतात. या भागातील कोकणवासी नागरिकांचा त्यांच्या मुळ गावी जाण्याचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मध्य रेल्वे अंतर्गत दिवा–सावंतवाडी रोड–दिवा ही एक्सप्रेस सोडली जाते. या एक्सप्रेसला दिवा आणि पनवेल स्थानकांवर थांबा दिला जातो. त्यामुळे या गाडीला नेहमीच मोठी गर्दी असते. ही एक्सप्रेस दिवा स्थानकातून सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी निघते.

परंतू, आता सुधारित वेळापत्रकानुसार १०१०५ डाउन दिवा–सावंतवाडी एक्सप्रेस ही १० ते १५ मिनिटे आधी म्हणजेच सकाळी ६ ते ६.१५ वाजताच्या दरम्यान दिवा स्थानकातून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांना पहाटेच दिवा जंक्शन रेल्वे स्थानकावर दाखल व्हावे लागणार आहे. याशिवाय या एक्सप्रेसच्या मार्गावरील इतर स्थानकांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

पनवेल, रोहा, चिपळून, रत्नागिरी, कुडाळ आणि सिंधुदुर्ग या स्थानकांवर ही गाडी आता वेळेच्या १०ते १५ मिनिटे आधी पोहोचणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रक 12 जानेवारीपासून लागू होणार असून, प्रवाशांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सावंतवाडी रोड–दिवा जंक्शन गाडीचेही वेळापत्रक बदलणार

सायंकाळी धावणाऱ्या सावंतवाडी रोड–दिवा जंक्शन एक्सप्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ही गाडीही आता पूर्वीपेक्षा १० ते १५ मिनिटे आधी धावणार असून, यामुळे परतीच्या प्रवासातही वेळेची बचत होणार आहे. सावंतवाडी स्थानकावरही जाताना प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी असे अवाहान करण्यात आले आहे.