रेल्वेपुलावरील कामे अंतिम टप्प्यात; संपूर्ण पूल खुला होण्यास दोन वर्षे लागणार

ठाणे : पूर्व द्रुतगती मार्गासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोपरी रेल्वे पुलावरील दोन नव्या मार्गिकांचे काम पूर्ण झाले असून येत्या दोन आठवडय़ांत या मार्गिका सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या मार्गावर विद्युत खांबाची उभारणी तसेच काही ठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम शिल्लक राहिले आहे. हे काम येत्या १० ते १२ दिवसांत पूर्ण होईल असा दावा मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.

मुंबई आयआयटीने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरवल्यानंतर एमएमआरडीए आणि मध्य रेल्वेच्या माध्यमातून नवा पूल उभारणीचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार रेल्वे पुलाच्या हद्दीतील काम मध्य रेल्वे करत आहे. तर उर्वरित रस्ता एमएमआरडीए तयार करत आहे. एमएमआरडीएने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येकी २३ फूट रुंद वाहिनीचे काम पूर्ण केले आहे. काही भागात काँक्रीटीकरणाचे काम अद्याप शिल्लक आहे. हे काम येत्या दोन दिवसांत सुरू होणार असून काँक्रीट सुकविण्यासाठी चार-पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर काही ठिकाणी विद्युत खांब बसविण्याचे काम केले जाणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान १० ते १२ दिवस लागणार आहे. दोन आठवडय़ांनंतर येथील मार्गिका वाहतूकीसाठी खुली केली जाणार आहे.

या पुलाच्या दोन नव्या मार्गिका सुरू झाल्यानंतर उर्वरित दोन मार्गिकांचे काम सुरू केले जाणार आहे. या मार्गिकांच्या निर्माणासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दीड ते दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे.