ठाणे : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८० हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात साडेसहा दशकांपूर्वी करण्यात आले. या बाधित कुटूंबांना विस्थापनानंतर सोयीसुविधा मिळतील, अशी आशा होती. परंतु त्यांच्या पदरी अद्यापपर्यंत निराशाच पडली आहे. गावठाण मंजुरी आणि महसुली दर्जाअभावी ही कुटुंबे सेवा-सुविधांपासून वंचित असल्याचे समोर आले असून या कुटूंबांनी शुक्रवारी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या कुटूंबियांचे पुनर्वसन सुमारे ६५ वर्षांपूर्वी करण्यात आले. यातील ८० हून अधिक प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आले. या बाधित कुटूंबांना विस्थापनानंतर सोयीसुविधा मिळतील, अशी आशा होती. परंतु त्यांच्या पदरी अद्यापपर्यंत निराशाच पडली असून या कुटुंबांच्या तीन पिढ्या सोयी सुविधांपासून वंचित असल्याची बाब समोर आली आहे. या कुटूंबियांनी शुक्रवारी भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडल्या.
प्रकल्पग्रस्त सुविधेपासून वंचित का?
भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर हे जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम राबवितात. या उपक्रमात ते नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. शुक्रवारी या कार्यक्रमादरम्यान, भिवंडीत पुनर्वसन झालेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांनी आमदार केळकर यांची भेट घेतली. महसुली दर्जा आणि गावठाण मंजुरीअभावी कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित असल्याचे सांगत प्रकल्पग्रस्तांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांना मागणीपत्र दिले.
प्रकल्पग्रस्तांची मागणी काय ?
महसुली गावाचा दर्जा आणि गावठाण दर्जा मिळाला नसल्याने शासनाच्या विकास योजना तसेच सोयी-सुविधांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे गेल्या ६५ वर्षांत तीन पिढ्यांचे जीवनमान ढासळले आहे. जिल्हा परिषदेची विकासकामे सुरू असून अन्य गावांना निधी मिळाला असला तरी करंजवडे गावाला निधी मिळाला नसल्याची खंत प्रकल्पगस्तांनी व्यक्त केली. किमान सात एकर जागा असलेल्या गावाला महसुली दर्जा दिला जातो, परंतु करंजवडे गाव चार एकरवर असून आणखी तीन एकर जमीन गावाला मिळावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी निवेदनातून केली आहे.
केळकरांचे आश्वासन
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात लवकरच संयुक्त बैठक आयोजित करून महसुली दर्जा आणि गावठाण मंजुरी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आमदार केळकर यांनी यावेळी दिले. तसेच केळकर यांचा गावाला महसूल दर्जा आणि गावठाण मंजुरीबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू असून त्याला यश मिळेल, असा विश्वास प्रकल्पग्रस्तांनी यावेळी व्यक्त केला.
इतरही समस्यांची निवेदने भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात शुक्रवारी ठाण्यासह इतर तालुक्यांतील नागरिकही समस्यांची निवेदने घेऊन आले होते. यात बाळकुम येथील दोस्ती गृहसंकुल परिसरात वाढत्या अपघातांमुळे गतिरोधकाची मागणी, ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी कामगारांच्या समस्या, मॉडेला चेक नाका येथील कामगार कार्यालय, बेथनी रुग्णालयात रुग्णाचे बिल कमी करणे, शर्मिला सोसायटी, शिधावाटप कार्यालय, सन मोटर्स यांनी केलेली फसवणूक, विकासकाकडून झालेली फसवणूक आदी समस्यांची निवेदने होती. केळकर यांनी काही प्रकरणात तत्काळ संबंधितांना फोन करून त्यावर निर्णय घेतले तर काही प्रकरणांचा पाठपुरावा करून नागरिकांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले.

