ठाणे : कृष्ण जन्माष्टमी अवघ्या चार दिवसांवर आली असताना ठाण्यातील मध्यवर्ती बाजारपेठेत सणाच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. बालकृष्ण व राधेच्या वेशभूषेपासून मुकुट, मोरपिस, बासरी, दागिने, पाळणा व सजावटीच्या साहित्याने दुकाने सजली आहेत. नवजात बालकांचे कृष्णाच्या वेशभूषेत छायाचित्रण करण्याचा वाढता कल लक्षात घेता यंदा बालकृष्णाच्या पोशाखांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. घराघरांत कृष्णाची मूर्ती, पाळणा व सजावट करण्याची परंपरा असून, अनेक कुटुंबांमध्ये लहान मुलांना कृष्ण-राधेच्या वेशभूषेत सजवले जाते. त्यामुळे सणाच्या काही दिवस आधीपासूनच पोशाख, मुकुट, मोरपिस, बासरी व सजावटीच्या साहित्याची मागणी वाढते.

ठाण्यातील बाजारपेठांमध्ये जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर कृष्ण-राधेचे विविध प्रकारचे पोशाख दाखल झाले आहेत. आकर्षक मुकुट, मोरपिस, बासरी, दागिने तसेच कृत्रिम फुले व अन्य सजावटीचे साहित्य खरेदीसाठी उपलब्ध आहे. शिवाय, दहीहंडी पथकांसाठी आकर्षक नक्षी व घोषवाक्य असलेल्या टी-शर्टनाही मागणी वाढली आहे. जन्माष्टमीच्या निमित्त बालकांना कृष्ण व राधेच्या वेशभूषेत सजवून छायाचित्र काढण्याकडे पालकांचा कल आहे. त्यामुळे या वयोगटासाठी असलेल्या पोशाखांच्या विक्रीतही वाढ होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

भाड्यानेही पोशाख

जन्माष्टमीसाठी कृष्ण-राधेचे पोशाख भाड्याने घेण्याची सुविधाही बाजारात उपलब्ध आहे. दहा वर्षांखालील मुलांच्या कृष्णाच्या पोशाखाचे एक दिवसाचे भाडे ५५० रुपये असून त्यात बासरी व मुकुटाचा समावेश आहे. दहा वर्षांवरील मुलांसाठी हे भाडे ६५० रुपये आहे. राधेच्या पोशाखासाठी ५५० रुपये भाडे असून त्यासोबत दागिने दिले जातात. केवळ पोशाख घ्यायचा असल्यास ४५० रुपये भाडे आकारले जाते, अशी माहिती पोशाख विक्रेते तेजा जयस्वाल यांनी दिली.

१५० रुपयांपासून पोशाख

कृष्णाच्या पोशाखांची किंमत २८० ते ३६० रुपयांदरम्यान असून, वयानुसार किमतीत वाढ होते. या पोशाखासोबत बासरी व मुकुट दिला जातो. राधेच्या पोशाखांची किंमत १५० ते ४७० रुपयांपर्यंत आहे. फ्री-साइज पोशाख ९०० रुपयांपासून उपलब्ध आहेत, अशी माहिती पोशाख विक्रेते संजय रंका यांनी दिली.