बदलापूरः एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे प्रत्येक कार्यक्रमात सांगत असताना दुसरीकडे त्यांच्याच ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांमध्ये मात्र घराणेछाहीची छाप स्पष्टपणे दिसते आहे. शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांमध्ये निवडणुकीचे नेतृत्व करणाऱ्या शहरप्रमुखांच्याच कुटुंबात त्यांच्यासह सहा जणांना उमेदवारी मिळाली आहे. तर दुसऱ्या माजी नगराध्यक्षांच्या कुटुंबात तीन जणांना उमेदवारी मिळाली आहे. पक्षाच्या माजी गटनेत्यांसह पत्नीलाही उमेदवारी मिळाली आहे. विशेष म्हणजे उमेदवारीची शक्यता नसल्याने राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचे अवघे दोन दिवसे उरले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी संभाव्य उमेदवारांना त्यांच्या प्रभागात तयारीचे आदेश दिले आहेत. उमेदवार यादी शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आली नसली तरी शहरातील सर्वच प्रभागात संभाव्य उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून शहरप्रमुखांनी अनेक उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले आहे.
शिवसेनेच्या या संभाव्य उमेदवारांमध्ये घराणेशाहीची छाप असल्याचे दिसून आले आहे आहे. या निवडणुकीचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या घरातील सहा जणांचा संभाव्य उमेदवारी यादीत समावेश आहे. यात खुद्द शिवसेना शहप्रमुख वामन म्हात्रे प्रभाग १९ मधून, त्यांचा मुलगा वरूण म्हात्रे प्रभाग ३ मधून, त्यांचे बंधू माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे प्रभाग १ मधून, उषा तुकाराम म्हात्रे प्रभाग ९, तर पुतण्या भावेश म्हात्रे प्रभाग २१ मधून उमेदवार असणार आहे. तर वामन म्हात्रे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका वीणा म्हात्रे या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असणार आहेत. विशेष म्हणजे वामन म्हात्रे यांचे बंधू हे भाजपातून कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत.
माजी नगराध्यक्षा विजया राऊत या यंदा प्रभाग १८ मधून उमेदवार असतील. त्यांच्या लहान जाऊबाई आणि माजी नगरसेविका शितल राऊत प्रभाग १९ तर त्यांचे पती प्रविण राऊत हे प्रभाग १७ मधून उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेनेचे माजी गटनेते श्रीधर पाटील हे प्रभाग क्रमांक ४ मधून उमेदवार असतील. त्यांच्याच प्रभागात त्यांच्या पत्नी स्वप्ना पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
पूर्वेत प्रभाग १५ आणि १६ मधून पाटील कुटुंबियांतील तिघांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यात प्रथमेश पाटील, रोहन पाटील आणि वैशाली पाटील यांची उमेदवारी अंतिम झाल्याची माहिती आहे. पश्चिमेतील सोनिया ढमढरे या प्रभाग ८ तर त्यांचे बंधू संदेश ढमढेरे प्रभाग ९ मधून उमेदवार असतील. माजी नगराध्यक्षा जयश्री भोईर या प्रभाग ७ तर त्यांचे पती मुकुंद भोईर हे प्रभाग २० मधून उमेदवार असणार आहेत.
प्रतिक्रियाः अनेक माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य हे माजी नगरसेवक आहेत. ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचे प्रस्थापित उमेदवार आहेत त्या ठिकाणी पक्षातील कुणी इच्छुक नसल्याने त्यांना आव्हान म्हणून वरूण म्हात्रे आणि भावेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. आमचे लक्ष्य ४१ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे आहे. – वामन म्हात्रे, शहरप्रमुख, शिवसेना, बदलापूर.
एबी अर्ज वाटप, सोमवारी अर्ज दाखल करणार शिवसेनेतील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नसली तरी बहुतांश उमेदवारांना पक्षाकडून एबी अर्जांचे वाटप करण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षांसह पक्षाचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती बदलापूर शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवार हेच अंतिम उमेदवार असणार की त्या काही बदल होणार हे सोमवारी स्पष्ट होईल.
