बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीत बुधवार, १ एप्रिल पासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीची कडक अंमलबजावणी सुरू होत आहे. विशेष म्हणजे, प्रशासकीय कारवाई सुरू होण्यापूर्वीच शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी या मोहिमेला पाठिंबा देत प्लास्टिक पिशव्यांची बंदी केली आहे. दुकानदारांनी ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देणे पूर्णपणे बंद केले आहे. तर नगर परिषद प्रशासनानेही सहा पथके तयार करत बुधवारपासून कारवाईची तयारी केली आहे.

वारंवार कायदे आणि त्यात सुधारणा करूनही प्लास्टिक पिशव्यांची बंदी कागदावर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लहान मोठ्या गटार, नाले, नैसर्गिक नाले आणि थेट उल्हास नदीपर्यंत कचऱ्याच्या रूपातील प्लास्टिक जमा होत असल्याचे अनेकदा दिसून आले. त्यामुळे जुन्या प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीची अंमलबजावणी होणार का असा प्रश्न उपस्थित होत होता.
लोकनियुक्त नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी १ एप्रिलपासून प्लास्टिक मुक्तीचा संकल्प केला होता.

सुरुवातीला याबाबत व्यापारी वर्गाकडून प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र पुढे या आवाहनाला व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात अनेक ठिकाणी दुकानदारांनी आठवडाभरापूर्वीच प्लास्टिक पिशव्यांचा साठा बाजूला सारून कापडी व कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे.

दुकानांच्या दर्शनी भागात नगर परिषदेचे पत्रक लावून ग्राहकांत जनजागृती केली जात आहे. अनेक ठिकाणी अजूनही कोणत्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असेल याबाबत संभ्रम आहे. मात्र तरीही दुकानदारांनी खबरदारी म्हणून प्लास्टिक पिशव्या देण्यास नकार सुरू केला आहे. त्यामुळे ग्राहकांची कोंडी होते आहे.

बुधवारपासून ज्या व्यापारी किंवा विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशव्या आढळतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून माल जप्त केला जाईल. यासाठी पालिकेची विशेष ६ पथके सज्ज झाली आहेत. भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि किराणा दुकानदार यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना दंड सोसावा लागणार आहे, अशी माहिती कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिली आहे.

या वस्तूंवर बंदी

एकल वापराच्या सर्व प्रकारच्या १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, सजावटीचे प्लास्टिक, थर्माकॉल, प्लास्टिकच्या प्लेट, कप, पीव्हीसी बॅनर शा वस्तूंवर बंदी आहे. या वस्तूंचा साठा किंवा वापर आढळल्यास पहिल्यांदा ५ हजार रूपये, दुसऱ्यांदा १० हजार रूपये आणि तिसऱ्यांदा २५ हजार रूपये आणि तीन महिन्याचा कारावास अशी शिक्षा असेल.