बदलापूरः राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात प्रत्येक महसूल विभागातील उत्कृष्ट तालुका कार्यालयांची नुकतीच निवड करण्यात आली. यात सर्वोत्तम तालुका कार्यालयांच्या नगर परिषद आणि नगर पंचायत विभागात कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा प्रथम क्रमांक आला आहे. गेल्या काही दिवसात केलेल्या कार्यालयीन सुधारणा, पारदर्शकता, नागरिकस्नेही कार्यालयीन बदलांमुळे पालिकेचा प्रथम क्रमांक आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची सुत्रे सांभाळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम हाती घेतला. यासाठी भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) संस्थेतर्फे मुल्यमापनाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कार्यालयीन पद्धतीत सुधारणा करणे अपेक्षित होते. शासकीय संस्था, ज्यात पोलीस, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध मंत्रालयीन विभाग यांचा समावेश होता. नागरिकांना सेवा देताना सहजता असावी. सोबतच पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा वापर, लोखाभिमूख उपक्रम आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णयानुसार उपक्रमांची आखणी झाली होती.
कार्यालयांनी वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर काम करणे अभिप्रेत होते. त्यानुसार या कार्यालयांचे मुल्यमापन करण्यात आले. १ मे महाराष्ट्र दिनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय निकाल जाहीर केला. त्यात राज्यात ठाणे जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उल्हासनगर महापालिका आयुक्त तर मिरा भाईंदर पोलीस आयुक्त राज्यात अव्वल आले होते.
त्यानंतर नुकतीच प्रशासकीय विभागस्तरीय निकाल जाहीर करण्यात आले. या निकालात ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपरिषद ही कोकण विभागात तालुका स्तरावर प्रथम आली आहे. संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण, ऑनलाईन सेवांची वाढलेली संख्या, ई कार्यालय प्रणालीचा अवलंब, पारदर्शकता, नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी सुविधा अशा अनेक बदलांसाठी मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी पाऊले उचलली होती. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा पहिला क्रमांक आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर ही सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट, अथक मेहनत आणि सेवाभाव याचे यश असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिली आहे.