scorecardresearch

अधिकाऱ्यांना हटवून नव्याने प्रभाग रचना करा भाजप शहर अध्यक्षांची सुनावणीवेळी मागणी

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनंतर अखेर पालिका प्रशासनाने १० ते १४ मे दरम्यान सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यात बदलापूर शहरातून एकूण ११३ सूचना आणि हरकती घेण्यात आल्या होत्या.

thane zp office
शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सहभागी होत हरकती नोंदवल्या

-सागर नरेकर

कुळगाव बदलापूर नगरपालिकेची प्रभाग रचना रद्द करून नव्या अधिकाऱ्यांना नेमून त्यांच्याकडून नव्याने ही रचना करावी, अशी आग्रही मागणी शुक्रवारी भाजपच्या वतीने मांडण्यात आली. शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर मागवण्यात आलेल्या सूचना आणि हरकतींवर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. याप्रसंगी शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सहभागी होत हरकती नोंदवल्या.

कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी पालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. मात्र त्यावर हरकती आणि सूचना नोंदणवण्यासाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नव्हता. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनंतर अखेर पालिका प्रशासनाने १० ते १४ मे दरम्यान सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यात बदलापूर शहरातून एकूण ११३ सूचना आणि हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यावर शुक्रवारी २० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सुनावणी पार पडली. याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, प्रशासन अधिकारी संतोष देहेरकर, कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी सूचना मांडताना भाजप पश्चिमेतील शहर अध्यक्ष शरद तेली यांनी ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रभाग रचना करण्याची मागणी केली.

नव्या अधिकाऱ्यांना नेमा तरच ही रचना न्याय होईल असेही तेली यावेळी म्हणाले. प्रभाग क्रमांक २ चे अंतर्गत अंतर ४किलोमीटर असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. चुकीच्या पद्धतीने गट जोडल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. प्रभागांची रचना इमारतीवरून जाते कशी असा सवालही त्यांनी यावेळी केला. दुजाभाव न करता रचना केल्यास न्याय निवडणूक होणार नाही, असेही तेली यावेळी म्हणाले. शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी यावेळी मांजर्ली गाव, ग्रीनवुड संकुल आणि इतर भाग प्रभाग एक मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली. तर इमारतीचे विभाजन करत प्रभाग रचना केल्याचा आरोप यावेळी भाजपचे माजी नगरसेवक सूरज मुठे यांनी यावेळी केला. कुणाच्या तरी सांगण्यावरून ही रचना केल्याचेही आरोप त्यांनी यावेळी केला. तर कोणताही रस्ता, नाला नसताना थेट इमारतींच्या संरक्षक भिंतीवरून प्रभागाच्या सीमा वळवल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या तुषार साटपे यांनी यावेळी केला.

किमान सीमा उघड्या डोळ्यांना दिसाव्यात अशी अपेक्षा साटपे यांनी बोलून दाखवली. भाजपचे राजेंद्र घोरपडे यांनी शहरातील गावठाण फोडल्याचे सांगत ते एकसंध ठेवण्याची मागणी यावेळी केली. तर संभाजी शिंदे यांनीही प्रभाग रचनेच्या मूळ संकल्पेवरून सूचना मांडल्या. जनगणना होत असताना प्रगणक गटाचा विचार करावा असेही यावेळी शिंदे यांनी सुचवले. सुनावणी दरम्यान सर्वच राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी ही प्रभाग रचना कुणाच्या तरी सांगण्यावरून केल्याचे दिसून येत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यापुढे मांडली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kulgaon badlapur ward issue bjp demand scsg

ताज्या बातम्या