ठाणे : मध्य रेल्वेवरील कुर्ला रेल्वे स्थानक हे अत्यंत महत्त्वाचे आणि कायम प्रवाशांनी गजबजलेले रेल्वे स्थानक मानले जाते. दररोज लाखो प्रवासी या स्थानकातून प्रवास करत असताना, सध्या येथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वेच्या अधिकृत स्टॉलवर उपलब्ध होणाऱ्या ‘रेल नीर’ पाण्याच्या बाटल्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना शुद्ध आणि थंड पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, कुर्ला स्थानकातील अनेक रेल्वे स्टॉलवर ‘रेल नीर’ उपलब्ध नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

परिणामी, प्रवाशांना तहान भागवण्यासाठी स्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या पाणपोयांवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, वाढत्या तापमानाचा परिणाम या पाणपोयांवरही दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्यांमधील पाणी गरम होत असल्याने प्रवाशांना थंड किंवा शुद्ध पाणी मिळणे कठीण झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच लांब पल्ल्याच्या प्रवाशांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. नाईलाजाने नागरिकांना गरम पाणी पिऊनच तहान भागवावी लागत असल्याचे चित्र स्थानक परिसरात दिसून येत आहे.

कुर्ला हे मध्य आणि हार्बर मार्गांना जोडणारे महत्त्वाचे जंक्शन असल्याने येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी तर स्थानकावर अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नसते. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा सुरळीत उपलब्ध नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाने तातडीने ‘रेल नीर’चा पुरवठा नियमित करावा, तसेच स्थानकातील पाणपोयांमध्ये थंड आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करून रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे