बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांत टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत; मात्र उच्च क्षमतेची अग्निशमन वाहने नसल्याने इमारतींना परवानगी देण्याचा आणि अनामत रक्कम घेण्याचा अधिकार मात्र पालिकेला नव्हता, मात्र नव्या एरियल लॅडर प्लॅटफॉर्ममुळे आता या परवानग्या आणि त्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नामांकित बांधकाम व्यावसायिक बदलापुरात टोलेजंग इमारतींची निर्मिती करत असून त्यातून शहरात मोठय़ा वसाहती उभ्या राहत आहेत. या इमारतींना आपत्कालीन परिस्थितीत सेवा देण्यासाठी बदलापूर पालिकेचे अग्निशमन दलच कामी येत होते. मात्र अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक यंत्रणा  नसल्याने टोलेजंग इमारतींच्या ना हरकत परवानगीचा अधिकारी मुंबईच्या राज्य अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयाकडे होता. त्याचप्रमाणे या ना हरकत परवानगीपोटी मिळणारी लाखो रुपयांची अनामत रक्कमही मुंबईच्या कार्यालयाकडे वळती होत होती. मात्र शहरात अशा मोठय़ा वसाहतींमध्ये घडलेल्या कोणत्याही घटनेवेळी स्थानिक अग्निशमन दलालाच प्रथम हजर व्हावे लागत होते. त्यामुळे सेवा देऊनही कोणताही मोबदला मिळत नसल्याची भावना पालिका आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये होती. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता ठाणे’मधून प्रकाशित करण्यात आले होते. त्यामुळे बदलापूर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी नव्या उच्च क्षमतेच्या वाहनासाठी हालचाली सुरू केल्या. त्यासाठी मुंबई आणि उपनगरातील महत्त्वाच्या महापालिकांच्या वाहनांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून एरियल लॅडर प्लॅटफॉर्म ही ६० मीटर उंचीच्या अग्निशमन वाहनाच्या खरेदीला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

१८ कोटींची गरज

नगरपालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात यासाठी १२ कोटींची तजवीज करण्यात आली होती. नव्याने येणाऱ्या या एएलपी वाहनासाठी १७ कोटी ८८ लाखांची गरज पडणार आहे. त्यात तीन वर्षांची देखभाल दुरुस्ती आणि मनुष्यबळाचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. येत्या वर्षभरात हे वाहन बदलापूर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यामुळे शहरातील नव्याने उभ्या राहणाऱ्या मोठय़ा इमारतींच्या रक्षणाची जबाबदारीही पार पडता येणार असल्याची प्रतिक्रिया मुख्य अग्निशमन अधिकारी आर. बी. पाटील यांनी दिली आहे.