चौथ्या मुंबईचे आरोग्य गंभीर

नगरपालिका रुग्णालयात रेबीजची लस उपलब्ध नसल्याचेही उघड झाले होते.

अंबरनाथ, बदलापूरमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा अभाव

वाढत्या नागरिकीकरणामुळे गेल्या काही वर्षांपासून अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची ओळख चौथी मुंबई अशी करून दिली जात आहे. या भागातील लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असून बदलापूर पलीकडच्या भागातही नागरीकरणाने वेग धरला आहे. या पाश्र्वभूमीवर या शहरांमध्ये आरोग्य सुविधांची मात्र वानवा दिसत असून  गेल्या काही दिवसांत घडलेल्या काही घटनांमुळे या दोन्ही शहरांतील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत.

अंबरनाथ आणि बदलापूर ही दोन्ही शहरे परवडणाऱ्या घरांसाठी आणि मध्यमवर्गीय नोकरदारांसाठी प्रथम पर्याय म्हणून अनेकांच्या पसंतीस उतरली आहेत. या शहरांची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. याचा सार्वजनिक सुविधांवर मोठय़ा प्रमाणावर ताण पडतो आहे. या शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष देण्याचा प्रयत्न होत असला तरी आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. गेल्या महिन्यात बदलापुरात रविवारच्या दिवशी एका लहानग्याला तात्काळ उपचार न मिळाल्याने त्याच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

त्यात नगरपालिका रुग्णालयात रेबीजची लस उपलब्ध नसल्याचेही उघड झाले होते. त्यामुळे शासकीय रुग्णालयांची दुरवस्था आणि त्यातील सोयीसुविधांची कमतरतेवर प्रकाश पडला आहे. चौथ्या मुंबईचा अविभाज्य भाग असलेल्या या दोन्ही शहरांमध्ये अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णालये नाहीत. त्यामुळे गंभीर अपघात, मोठे आजार आणि आपात्कालीन परिस्थितीत तात्काळ उपचार शहरात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना कल्याण, ठाणे या शहरांकडे धाव घ्यावी लागते. गेल्या वर्षी झालेल्या दर्शना पवार या तरुणीचा रेल्वे अपघातानंतर तात्काळ उपचार न मिळाल्याने मृत्यू ओढवला होता.

शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना कल्याणपर्यंत रुग्णालयात पोहोचवण्यास वेळ लागला होता. त्यामुळे शहरात ठोस अशी वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध नसल्याचे चित्र ठसठशीतपणे दिसून येत आहे. या दोन्ही शहरांत रुग्णालयांची संख्या वाढते आहे. मात्र अत्याधुनिक सोयीसुविधांचा सुसज्ज अशी व्यवस्था नसल्याने रुग्णांना कल्याण डोंबिवलीचा रस्ता धरावा लागत आहे.

रविवारच्या सुट्टीत रुग्णांचे हाल

आरोग्य सुविधांसोबतच रविवारच्या दिवशी नामवंत रुग्णालयांतील आणि इतर रुग्णालयांतील डॉक्टरांची अनुपलब्धता हा रुग्णांसाठी चिंतेचा विषय आहे. अशा वेळी रुग्णांना पुन्हा लगतच्या शहरांची वाट धरावी लागते. त्यामुळे सर्व डॉक्टरांनी विचार विनिमयातून आलटून पालटून सेवा द्यावी, अशी मागणी आता नागरिक करताना दिसत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीचाही फटका नागरिकांना बसत असल्याचे दिसते आहे.

डॉक्टरांनाही वैयक्तिक आयुष्य आहे

आजच्या घडीला अनेक डॉक्टरांना एखाद्या कारणामुळे लक्ष्य केले जाते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत बदलापुरात बोटावर मोजण्याइतकी रुग्णालये सुरू झाली आहे. त्यात बदलापूरसारख्या दुय्यम शहरात नागरिकांची खर्च करण्याची मानसिकता नाही. त्यामुळे अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय उभे करणे खर्चीक ठरेल. तसेच डॉक्टरांनाही खासगी आयुष्य आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी त्यांनी उपस्थित राहणे गरजेचे नाही, अशी प्रतिक्रिया एका डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तसेच खासगी रुग्णालयांकडून जी अपेक्षा केली जाते तीच अपेक्षा सरकारी रुग्णालयांकडून का केली जात नाही, असाही सवाल अनेक खासगी डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lack of modern health facilities in ambernath badlapur