scorecardresearch

मुंब्रा रेल्वे स्थानकातील नवीन फलाटांवर पाण्याचा ठणठणाट. कचरा, घाण, दुर्गंधीने प्रवासी हैराण

मुंब्रा स्थानकातील नवीन फलाटांवर पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणून अनेक प्रवाशांनी अधिकार्‍यांकडे मागणी केली आहे

भगवान मंडलिक

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने बांधलेल्या मुंब्रा रेल्वे स्थानकांमध्ये दोन नवीन फलाटांवर पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. पाण्याच्या अभावामुळे फलाटांवर स्वच्छता होत नाही. फलाटांवर प्रवाशांना पाणी पिण्यासाठी, हात धुणीसाठी केलेली व्यवस्था घाणीने बरबटल्याचे चित्र दिसत आहे.

मुंब्रा रेल्वे स्थानकातून दररोज मुंब्रा, शीळ, दहिसर परिसरातील नोकरदार, व्यवसायिक मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. सामानाची वाहतूक व्यवसायिक करत असतात. लोकल मधून मुंब्रा स्थानकातील नवीन फलाटावर उतरल्यावर पाण्याच्या ठिकाणी गेल्यावर प्रवाशांना पाणी मिळत नाही. सुविधेच्या ठिकाणी नळांची व्यवस्था जागोजागी केली आहे. तिथे पाणी नसल्याने प्रवासी, हमाल यांचे हाल होत आहेत.

नवीन फलाटावरील पाणी पिण्याची सुविधा असलेली ठिकाणे, हात धुणीची ठिकाणे, प्रसाधनगृहामध्ये पाणी नसल्याने याठिकाणी प्रवाशांनी थुंकून, कचरा टाकून घाण केली आहे. खाऊची वेस्टने पाणी सुविधेच्या खळग्यात, कोपऱ्यावर टाकली जातात. नवीन फलाटावर पाणी नसल्याने प्रवाशांना जुन्या फलाट क्रमांक ३ व ४ वर जावे लागते. या फलाटावर एका सामाजिक संस्थेने दिलेला फिल्टर आहे. तो बंद असेल तर प्रवाशांना पाण्याची बाटली विकत घेऊन तहान भागवावी लागते, असे मुंब्रा रेल्वे प्रवासी संघटनेचे एडवोकेट अब्दुल्ला पठाण यांनी सांगितले. मुंब्रा स्थानकातील नवीन फलाटांवर पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणून आपण स्वतः अनेक प्रवाशांनी अधिकार्‍यांकडे मागणी केली आहे. परंतु अधिकारी लक्ष देत नाहीत, असे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल्ला पठाण यांनी सांगितले.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची वारंवार संपर्क केला. लघुसंदेश पाठवून विचारणा केली. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lack of water at new mumbra railway station due to unhygienic conditions railway passengers annoyed asj

ताज्या बातम्या