समाज माध्यमांचा वापर करणार; वृद्धेचा विनयभंग झाल्याने चिंता
रेल्वे प्रवासी महिलांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन अनेक उपाययोजना राबवीत असले तरी एकटय़ादुकटय़ा महिलांना रेल्वेतून प्रवास करणे आजही असुरक्षित वाटत असल्याचे त्यांच्या चर्चेतून दिसून आले आहे. शनिवारी चर्चगेट- विरार या लोकलमध्ये एका वृद्धेचा विनयभंग झाल्यानंतर महिलांच्या चर्चेतून हा मुद्दा पुढे आला आहे. त्यातून महिलांनी एकटीने प्रवास करण्यापेक्षा एकजुटीने प्रवास करण्याची चर्चा लोकलमधील महिला डब्यांत सुरूआहे. त्यासाठी विशिष्ट लोकलने निश्चित वेळी प्रवास करणाऱ्या महिलांनी वेळा विचारून एकमेकींचे क्रमांक घ्यावेत, अशी सूचना एका महिलेने केली. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे, हेल्पलाइन नंबर, डब्यात रेल्वे पोलिसांची उपस्थिती अशा अनेक उपाययोजना राबविल्या. असे असले तरी शनिवारी रात्री एका सत्तर वर्षीय महिलेच्या झालेल्या विनयभंगाच्या घटनेने महिलांमध्ये पुन्हा एकदा असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. एरवी एकमेकींसोबत कडाडून भांडणाऱ्या महिला अशा काही घटना घडल्यानंतर मात्र एकमेकींसोबत सामंजस्याने वागताना दिसून येतात. रेल्वे प्रशासनाने महिला सुरक्षिततेसाठी महिला डब्यांत सीसीटीव्ही लावण्यास सुरुवात केली आहे. परंतु अद्याप सर्वच लोकल डब्यांत ते बसविले गेलेले नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला डब्यात पोलिसांचीही व्यवस्था करण्यात आली. परंतु अनेकदा दहानंतर या डब्यांत रेल्वे पोलीस दिसून येत नाहीत.
सध्या महिला सकाळ, दुपार व रात्र अशा तीन वेळांत काम करतात. त्यांना रात्री अपरात्री रेल्वेने प्रवास हा करावाच लागतो. अशा घटनांमुळे ती बिनधास्त प्रवास करूशकत नाही. शिवाय प्रत्येक स्थानकात गाडी थांबल्यानंतर गाडीत कोण चढते कोण नाही याकडे पाहात बसायचे यात महिलांच्या मनावर तणाव येतो. गाडी सुरू झाल्यावर कुणी डब्यात चढले तर काय करायचे, असा प्रश्न अनेक महिलांना सतावत असतो. त्यातून एकटीने प्रवास करण्यापेक्षा महिला प्रवाशांनी एकजुटीने प्रवास करण्याचा उपाय पुढे आला आहे.

रेल्वे प्रशासन त्यांच्या परीने उपाय योजत असले तरी महिला आजही सुरक्षित नाही. प्रत्येक महिलेला सुरक्षा देणे त्यांनाही शक्य नाही. अशा वेळी महिलांनीच यावर काही ना काही तोडगा काढायला हवा. मी स्वत सीएसटी येथे कामाला जाते. माझी कधी दुपारची तर कधी रात्रीची शिफ्ट असते. अशा वेळी रात्री अपरात्री मला रेल्वेने प्रवास करावा लागतो.
– वृषाली चांदेकर, प्रवासी

मी विक्रोळी येथे कामाला आहे, मीडीयामध्ये काम करत असल्याने मला अनेकदा रात्रीची शिफ्ट असते. एरवी आपण सोशल मीडिीयावर (व्हॉट्सअ‍ॅप) सतत अपडेट असतो. त्याचाच थोडा सुरक्षेसाठी वापर करा. आपण ज्या स्थानकावर उतरतो, त्या स्थानकावरील महिलांशी ओळख वाढवून त्यांच्या कामावर येण्या-जाण्याच्या वेळा पाहून एकमेकांशी संपर्कात राहून एकटीने प्रवास करण्यापेक्षा एकजुटीने प्रवास केला तर असुरक्षिततेची भावना मनात निर्माण होणार नाही. अशा प्रकारे काही उपाययोजनांसाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी पुढाकार घ्यावा, अशा अपेक्षाही महिलांनी या वेळी व्यक्त केल्या.
– रंजना शिरसाय, प्रवासी