Ladki Bahin Marathi Movie: राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राबविल्यानंतर आता याच योजनेवर आधारित एक चित्रपट १५ मे या दिवशी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नाव देखील ‘लाडकी बहीण’ असे असून ‘१५०० रुपयांचा हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी’ असे शीर्षक देण्यात आले आहे. असे असले तरी हा चित्रपट सिनेमागृहत किती तग धरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना विधानसभा निवडणूकांपूर्वी राज्य सरकाने लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजने अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहे. या योजनेमुळेच महायुतीचे सरकार निवडून आल्याचे सत्ताधारी अनेकदा सांगतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या योजनेचा उल्लेख त्यांच्या भाषणात नेहमी करतात.

याच योजनेवर आधारीत लाडकी बहीण हा चित्रपट येत्या १५ मे या दिवशी चित्रपट गृहात प्रदर्शित केला जाणार आहे. ‘१५०० रुपयांचा हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी’ असे शीर्षक देण्यात आले आहे. या चित्रपटाचे टीजर देखील समाजमाध्यमावर प्रसारित झाला आहे. शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि शनिदेव फिल्मस् निर्मित चित्रपट हा चित्रपट आहे.

निर्मिती दिग्दर्शन शितल शिंदे यांचे आहे. तर कार्यकारी निर्माते बाबासाहेब पाटील असून कथा, पटकथा, संवाद गणेश शिंदे यांचे आहे. स्मिता तांबे, सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, गौतमी पाटील यासह अनेक अभिनेत्रींनी आणि अभिनेत्यांनी चित्रपटात काम केले आहे.