ठाणे – लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने काही महिन्यांपूर्वी सर्व लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी ” ई – केवायसी ” प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत सातत्याने घोळ झाल्याने अनेक लाभार्थी महिलांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागला. तर यातील किचकट प्रश्नांची उत्तरे देत अनेक महिलांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली. मात्र चुकीची उत्तरे दिल्याने आता बहुसंख्य महिलांचे गेल्या दोन महिन्यांचे १५०० रुपयांचे हफ्ते बँक खात्यात जमा झाले नसल्याने त्यांनी आता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली आहे. तर या लाडक्या बहिणींना रोज उत्तरे देता देता मात्र जिल्हा प्रशासनाच्या चांगलेच नाकी नऊ आले आहेत.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेचा लाभ पारदर्शकपणे योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ही प्रक्रिया अनेक महिलांसाठी डोकेदुखी ठरली. मोबाईल नसणे, इंटरनेटचा अभाव, आधारकार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, ओटीपी न येणे, तसेच ऑनलाईन प्रश्नावलीतील तांत्रिक भाषा समजण्यास अडचण येणे, अशा विविध कारणांमुळे अनेक महिलांची प्रक्रिया अर्धवट राहिली किंवा चुकीच्या नोंदी झाल्या.

विशेषतः ग्रामीण भागातील आणि अल्पशिक्षित महिलांना या प्रक्रियेत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी सायबर कॅफे किंवा मध्यस्थांच्या मदतीने ई-केवायसी करण्यात आली. मात्र यावेळी काही ठिकाणी चुकीची माहिती भरली गेली किंवा आवश्यक कागदपत्रे अपलोड न झाल्याने लाभार्थ्यांची नावे योजनेतून तात्पुरती वगळली गेल्याचे सध्या उघड होत आहे.

यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून खात्यात पैसे जमा न झाल्याने अनेक महिलांची कोंडी झाली आहे. या महिला आता रोज जिल्हाधिकारी कार्यालयात येत असून योजना बंद झाली आहे आणि आमचे पैसे देखील आले नाही, अशी तक्रार करत आहे. तर “योजना आमच्यासाठी सुरू केली, पण आता पैसेच मिळत नसतील तर आम्ही कुठे जायचे?” असा सवाल अनेक महिलांनी उपस्थित केला आहे. महिलांच्या तक्रारींचा ओघ वाढल्याने जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला व बालविकास विभागातर्फ़े दोन स्वतंत्र कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात येत असून त्यांच्याद्वारे महिलांना माहिती देण्यात येत आहे.

मुख्य कारणे काय ?

– अनेक महिलांच्या पतींनी आयकर भरला असल्याने ते या योजनेसाठी पात्र होत नाही. यामुळे काही महिलांचा हफ्ता बंद करण्यात आला आहे.

– एकाच रेशकार्ड वर दोन लाभार्थी असल्याने यातील एका लाभार्थ्यांचे नाव वगळण्यात आले आहे.

– सर्वात महत्वाचे यातील कारण म्हणजे केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे का ? तसेच आपण इतर कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेतात का ? या प्रश्नांची बहुसंख्य महिलांनी चुकीची उत्तर दिल्याने अनेक महिलांना हफ्ता बंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यलयात येणाऱ्या लाभार्थी महिलांना हफ्ता बंद होण्याची कारणे सांगितली जात आहे. सध्या नव्याने कोणतीही प्रक्रिया सुरु नाही. महिलांनी घाबरून जाऊ नये. यावर तोडगा काढण्यात येईल. याबाबत सरकारकडून योग्य माहिती अथवा निर्देश आल्यास सर्वांना त्याबाबत सांगण्यात येईल. – नमिता शिंदे, महिला बालविकास अधिकारी, ठाणे</strong>

लाडकी बहीण योजनेचा हफ्ता बंद झाला आहे. ई – केवायसी चुकीची झाल्याने हफ्ता बंद झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र याबाबत कोणताही तोडगा सांगितलं नाही. यावर तोडगा काढून हफ्ता पुन्हा सुरु करण्यात यावा. – निधी घोडविंदे, लाडकी बहीण योजना लाभार्थी, वाशिंद