डोंबिवलीतील भूमी अभिलेख कार्यालय कल्याणला

डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगरमधील ध. ना. चौधरी विद्यालयाजवळ असलेले भूमी अभिलेख कार्यालय पालिकेच्या जागेतून खाली करावे, अशी नोटीस कल्याण-डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाने भूमी अभिलेख कार्यालयाला दिली आहे.

स्थलांतराच्या हालचाली; पालिकेचे कार्यालय रिकामे करण्यासाठी नोटीस

भगवान मंडलिक

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगरमधील ध. ना. चौधरी विद्यालयाजवळ असलेले भूमी अभिलेख कार्यालय पालिकेच्या जागेतून खाली करावे, अशी नोटीस कल्याण-डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाने भूमी अभिलेख कार्यालयाला दिली आहे.

अनेक विकासकांनी डोंबिवलीत भूमी अभिलेख कार्यालय असल्याने स्थानिक पातळीवर कामे होतात. हे कार्यालय स्थलांतर झाले तर वेळ, प्रवास, कर्मचारी जागेवर नसेल तर वेळकाढूपणा हे प्रकार वाढतील, अशी भीती व्यक्त केली.

डोंबिवलीसाठी यापूर्वी फडके रस्त्यावरील अत्रे रंगमंदिराच्या वाचनालय जागेत भूमी अभिलेख कार्यालय होते. ही इमारत धोकादायक झाल्याने भूमी अभिलेख कार्यालय डीएनसी शाळेजवळील बहिणाबाई उद्यानाजवळील पालिकेच्या सर्वसमावेशक जागेत स्थलांतरित करण्यात आले. या ठिकाणी तीन गाळ्यांत कार्यालय सुरू होते. महत्त्वाच्या नोंदींची कामे पूर्ण झाल्यावर भूमी अभिलेख विभागाने एक गाळा पालिकेला परत केला. दोन गाळे स्वत:कडे ठेवले. येथे सर्वेक्षक, लिपिक संवर्गातील पाच कर्मचारी काम करतात. सध्या दोन कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती आहे.

कल्याणमधील खडकपाडा येथे पालिकेकडून भूमी अभिलेख कार्यालयाला सर्वसमावेशक आरक्षणातील एक जागा मिळणार आहे. तेथे कल्याणमधील झुंजार बाजारातील भूमी अभिलेख कार्यालय स्थलांतरित केले जाणार आहे, असे समजते. त्या जागेत डोंबिवलीचे कार्यालय तात्पुरते स्थलांतरित केले जाणार आहे, असे सूत्राने सांगितले.

पालिकेची डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत धोकादायक झाली आहे. येथील ‘ग’ प्रभाग कार्यालय सुनीलनगरमधील भूमी अभिलेख कार्यालय जागेत स्थलांतरित केले जाणार आहे. भूमी अभिलेख कार्यालय रिकामे करण्याची नोटीस दिली आहे. भूमी अभिलेख विभागाने अद्याप पालिकेशी संपर्क साधला नाही. त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल.

पल्लवी भागवत, उपायुक्त, मालमत्ता विभाग

शक्य आहे तोपर्यंत आम्ही डोंबिवलीत राहून सेवा देऊ. लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पालिका अधिकारी आम्हाला खूप सहकार्य करतात. सामोपचाराने हा विषय मिटवू.

संग्राम जोगदंड, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, कल्याण

कार्यालय न सोडण्यावर ठाम

 नोटीस मिळूनही या विभागाच्या वरिष्ठांनी हा प्रकार आपणास माहिती नसल्याचे सांगितले. दोन शासकीय संस्थांमधील हा विषय आहे. आम्ही या कार्यालयातून निघणार नाही. लोकांना सेवा देत राहू. प्रसंगी माध्यमांची मदत घेऊ, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Land records office dombivali kalyan ysh

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या