उल्हासनगरात पुन्हा रस्त्यांची चाळण ; खड्डे भरणी कुचकामी, शहरभर वाहतूक कोंडी

पालिका प्रशासनाकडून काही भागात खड्डे भरण्याचे काम केले जात असले तरी त्याचा तितकासा फायदा होताना दिसत नाही.

उल्हासनगरात पुन्हा रस्त्यांची चाळण ; खड्डे भरणी कुचकामी, शहरभर वाहतूक कोंडी
( उल्हासनगर शहरातील जवळपास सर्वच डांबरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत )

उल्हासनगर शहरातील जवळपास सर्वच डांबरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. शहरातील महत्वाचे रस्ते, जोडरस्त्यांची चाळण झाली आहे. परिणामी शहरातील सर्वच रस्ते वाहतूक कोंडीत अडकले आहेत. पालिका प्रशासनाकडून काही भागात खड्डे भरण्याचे काम केले जात असले तरी त्याचा तितकासा फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे शहरातून प्रवास करणारे वाहनचालक आणि नागरिक संताप व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे महत्वाच्या रस्त्यांवरही कोंडी सोडण्यासाठी वाहतूक पोलीस नसल्याने वाहनचालकांनाच रस्त्यावर येत कोंडीचे नियोजन करावे लागते आहे.

उल्हासनगर शहर आधीच दाटीवाटीचे शहर आहे. त्यात शहराचा सुमारे ६१ टक्के भाग वाणिज्य असून येथे वाहनचालक, ग्राहकांची कायमच रेलचेल असते. कॅम्प एक, दोन, तीन आणि चारच्या बहुंताश भागात वाहनांची संख्याही मोठी असते. अनेकदा रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. गेल्या काही दिवसात कल्याण बदलापूर राज्यमार्ग आणि कॅम्प दोन आणि तीन भागात रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडसर करणाऱ्या वाहनांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या सर्वच डांबरी आणि काही कॉंक्रिट रस्त्यांवर खड्डे उगवले आहेत.

उल्हासनगरच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्यमार्गावर फॉरवर लाईन, शिवाजी चौक, शांतीनगर चौक या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या राज्यमार्गाला कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सी ब्लॉक येथून जाणारा जोडरस्ता खड्ड्यात गेला आहे. पुढे धोबीघाट भागातून थेट मध्यवर्ती रूग्णालयापर्यंत येणारा रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. येथील सर्वच चौकांत फेरिवाल्यांचे बस्तान आहे. परिणामी येथून येजा करताना मोठा वेळ खर्ची घालावा लागतो. पुढे मध्यवर्ती रूग्णालय ते फॉरवर लाईन या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे येथेही मोठी वाहतूक कोंडी होते आहे. विशेष म्हणजे या सर्व रस्त्यांवर शहरातील महत्वाचे रूग्णालय आहेत. त्याचा रूग्णवाहिकांना फटका बसतो आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ठाण्यात वृक्ष उन्मळून पडण्याचे सत्र थांबेना ; गेल्या चोवीस तासात तब्बल १५ वृक्ष उन्मळून पडले
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी