कल्याण- शहापूर तालक्यातील (ठाणे जिल्हा) डोळखांब वनहद्दीत रानविहिर गावातील जंगलात बिबट्याने एका तरूण शेळी पालकावर हल्ला केला. त्याच्या जंगलात चरायला गेलेल्या चार बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या. नऊ बकऱ्या कळपात नसल्याचे शेळी पालकाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

किसन काळूराम खाकर (२६) या शेळी पालकावर बिबट्याने हल्ला केला. त्याच्या डोक्यावर, पाठीवर नखे मारून जखमा केल्या आहेत. किसन डोळखांब, खराडा वनक्षेत्र हद्दीतील रानविहिर गावात राहतो. त्याचा शेळी पालन व्यवसाय आहे. शनिवारी दुपारी त्याने गावाजवळील जंगलात ४० बकऱ्यांचा कळप चरण्यासाठी सोडला होता. त्यांच्या पाठीमागे किसन चालत होता. जंगलात उतारावर शेळया चरत होत्या. अचानक दोन शेळ्या चरताना दगडावरून खाली खेचल्याचे आणि गायब झाल्याचे किसन यांना दिसले. शेळी खडकावरून खाली पडली म्हणून तिला काढण्यासाठी किसन यांनी धाव घेतली. त्यावेळी दगडाच्या आडोशाला लपून बसलेल्या बिबट्याने दोन शेळ्यांना तोंडात पकडले होते. आपण ओरडा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आक्रमकपणे बिबट्याने आपल्यावर चाल करून खाली पाडून हल्ला केला. तोंडात शिकार असल्याने बिबट्या तेथून निसटला. आपण थोडक्यात त्याच्या तावडीतून बचावलो, असे किसन सांगतो.

Brutal killing of daughter along with wife in Buldhana
खळबळजनक ! पत्नीसह कन्येची निर्घृण हत्या; मारेकऱ्याने स्वत:ही घेतली विहिरीत उडी…
heart attack in the swimming pool
धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू

बिबट्याच्या हालचालींमुळे बकऱ्या जंगलातून आपल्या पाठोपाठ बाहेर पडल्या. ४० शेळ्या बाहेर आल्या का याची चाचपणी केली. नऊ शेळया जंगलातून बाहेर आल्या नाहीत. त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असण्याची शक्यता किसनने वनाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. किसनने ही माहिती पोलीस पाटील सुनील वेखंडे यांना दिली. वेखंडे यांनी डोळखांबचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रमोद थोरे, वनाधिकारी प्रशांत निकाळजे, हरिश्चंद्र भोईर, शरद रसाळ यांना कळविले. वन विभागाचा ताफा सामग्रीसह रानविहिरच्या जंगलात पोहचला. किसनने दिलेल्या माहितीच्या आधारे बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तो आढळून आला नाही.

डोळखांब, रानविहिर, खराडा वनहद्दीत बिबट्याचा संचार असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पळसाची पाने खुडण्याचा, आंबे, जांभळे, करवंदे रानमेवा जंगलात तयार झाला आहे. मार्च ते जूनपर्यंत या भागातील आदिवासी रानमेव्याचा व्यवसाय करतात. वन्यप्राणी हल्ल्यात नुकसान झाल्यास भरपाई द्यावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेतर्फे शासनाकडे केली जाणार आहे, असे संघटनेचे प्रकाश खोडका यांनी सांगितले.

“रानविहिर जंगलात तरूणावर वन्यप्राण्याने हल्ला केला. वन्यप्राणी आढळून आल्यास समुहाने रहिवाशांनी ओरडा करावा. आक्रमक प्रतिकार वन्यप्राण्यावर करू नका. गुरांच्या गोठ्यांचे दरवाजे रात्री बंद करा. भोंगे वाजवून जागृती केली जाणार आहे. वन्यप्राण्याने हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले तर बाधिताला भरपाई दिली जाईल,” अशी माहिती डोळखांबचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत निकाळजे यांनी दिली आहे.

“शिकारीसाठी जंगलांना वणवे लावले जातात. तृणभक्षक प्राणी अधिवास बदलतात. जंगलातील अन्नसाखळी तुटते. भक्ष्याच्या आशेने वन्यप्राणी गावाजवळील जंगलात संचार करतात. जंगलांचे संवर्धन, वणवे थांबले तर असे हल्ले होणार नाहीत,” असं सह्याद्री वनसंवर्धन संस्थेचे नीलेश डोहळे सांगतात.