Leopard Attack Rocky Dog Fight Murbad Farmhouse: मुरबाड येथील फार्म हाऊसवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ‘रॉकी’ नावाच्या पाळीव श्वानाने बिबट्याशी दिलेल्या थरारक झटापटीची माहिती मनसेचे माजी आमदार प्रमोद ऊर्फ राजू पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली आहे. बिबट्याने मागून हल्ला केल्यानंतर रॉकीने प्रसंगावधान राखत बिबट्याच्या डाव्या गालाला आणि हनुवटीला जोरदार चावा घेतला. रॉकीच्या प्रतिकारामुळे अखेर बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्याचे पाटलांनी सांगितले. सध्या रॉकी सुरक्षित असल्याचेही पाटलांनी पोस्टमध्ये म्हटलंय.
बिबट्या आणि रॉकीत झटापट
मनसेचे माजी आमदार प्रमोद ऊर्फ राजू पाटील यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ही घटना काल (सोमवारी) सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता मुरबाड येथील त्यांच्या फार्म हाऊसवर घडल्याचे नमूद केले आहे. “बिबट्याने कंपाऊंडच्या जाळीवरून उडी मारत रॉकीवर पाठीमागून हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यानंतरही रॉकीने क्षणाचाही विलंब न करता बिबट्याचा प्रतिकार केला. त्याने बिबट्याच्या डाव्या गालाला आणि हनुवटीला जोरदार चावा घेतल्याने बिबट्या स्वतःची सुटका करण्यासाठी धडपडू लागला. रॉकीने पकड सैल केल्यानंतर बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला”, असे पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
CCTV फुटेजमध्ये कैद झाला थरार
राजू पाटील यांनी केलेल्या पोस्टमध्ये रॉकी आणि बिबट्यामध्ये झालेल्या झुंजीचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील देण्यात आला आहे. या झटापटीत रॉकीला बिबट्याच्या नखांमुळे जखमा झाल्या. मात्र त्यानंतरही तो बिबट्या कोणत्या दिशेने गेला, हे पाहत उभा राहिल्याचे पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर या संपूर्ण प्रसंगाचा थरार लक्षात आल्याचेही त्यांनी सांगितले. रात्रीच डॉक्टरांना बोलावून रॉकीवर प्रथमोपचार करण्यात आले असून आता रॉकीची प्रकृती सुरक्षित असल्याचे पाटील यांनी म्हटलंय.
पाटलांनी उपस्थित केला मानव-वन्यजीव संघर्षाचा मुद्दा
घटनेची माहिती मुरबाड वनविभागाला तातडीने देण्यात आली असून वनविभागाने सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक उपाययोजना सुरू केल्याचे पाटील यांनी सांगितले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी मानव-वन्यजीव संघर्षाचा मुद्दाही उपस्थित केला आहे. “काल आमचा रॉकी होता ज्याने शौर्याने बिबट्याला पळवून लावले; पण उद्या त्याच ठिकाणी एखादा निष्पाप माणूस, महिला किंवा लहान मूलही असू शकते. याला जबाबदार कोण?”, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पाटलांचे आरोप
वन्यजीवांवर राग व्यक्त करण्यापेक्षा निसर्गाचा समतोल राखण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अन्यथा मानव-वन्यजीव संघर्षाचे संकट प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या संकटासाठी सरकारकडून विकासाच्या नावाखाली उद्योगपतीधार्जिण्या चुकीच्या योजनांना दिले जाणारे पाठबळ कारणीभूत असल्याचा आरोपही पाटील यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे.
