scorecardresearch

१२ तासाच्या थरारानंतर कल्याणमधील बिबट्याला पकडले; बिबट्याच्या हल्ल्यात चारजण जखमी

कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरात गुरुवारी एका संकुलात शिरलेल्या बिबट्याला १२ तासाच्या प्रयत्नानंतर पकडण्यात वन विभाग, प्राणी मित्र संघटनांना यश आले.

१२ तासाच्या थरारानंतर कल्याणमधील बिबट्याला पकडले; बिबट्याच्या हल्ल्यात चारजण जखमी
संग्रहित छायाचित्रत्र

कल्याण: कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरात गुरुवारी एका संकुलात शिरलेल्या बिबट्याला १२ तासाच्या प्रयत्नानंतर पकडण्यात वन विभाग, प्राणी मित्र संघटनांना यश आले. या बिबट्याने तीन नागरिक आणि एका वनसेवकाला जखमी केले आहे. बिबट्या हा भुकेला असल्याने आक्रमक होता, भुलीचे इंजेक्शन देऊन त्याला पकडणे शक्य झाल्याचे प्राणी मित्रांनी सांंगितले. दरम्यान, या बिबट्याला उपचारासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले आहे. 

हेही वाचा >>> ठाणे: गावदेवी मैदान आटले, मात्र सुविधांचीही खैरात; महापालिकेचा दावा

 चिंचपाडा भागातील श्रीराम अनुग्रह रहिवास इमारतीत गुरुवारी सकाळी ६ वाजता एक बिबट्या शिरला होता. मलंग गडाच्या जंगलातून इमारतीमध्ये शिरताना बिबट्याने दोन पादचाऱ्यांवर हल्ला केला. त्यानंतर श्रीराम अनुग्रह संकुलातीत शिरताना इमारतीतील एका रहिवाशावर हल्ला केला होता. रहिवाशाने आरडाओरड करत बिबट्याच्या तावडीतून सुटका करत घरात पळ काढला. तात्काळ दरवाजा बंद केल्याने ते बचावले. यांनतर इमारतीतील रहिवाशांनी एकमेकांनी संपर्क करुन घराबाहेर न पडण्याबाबत सतर्क केले, तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

हेही वाचा >>> ठाणे पोलिसांचे मध्यरात्री कोंबिग ऑपरेशन; १८४ जणांना अटक

इमारतीचा चिंचोळा आवार आणि बघ्यांची झालेली गर्दी यामुळे बिबट्याला पकडण्यात अडचणी येत होत्या. बिबट्या इमारतीच्या आवारातच लपून बसल्याने इमारतीतील रहिवासी सकाळपासूनच दार बंद करून घरातच बसले होते. विभागीय वन अधिकारी संजय चन्ने आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, पाॅज, वाॅर, सेवा, वफ या प्राणी मित्र संस्था, पोलीस यांनी श्रीराम अनुग्रह सोसायटीसह परिसराला वेढा घातला. जखमी रहिवाशाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या गच्चीतुन शिडीवरुन खाली उतरविले. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करताना एक वनसेवकही त्याच्या हल्ल्यात जखमी झाला. स्थानिक वनाधिकाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करणे शक्य नसल्याने बोरीवली येथून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या बचाव पथकाला दुपारी पाचारण करण्यात आले. या पथकातील नेमबाजांनी बिबट्यावर भुलीची इंजेक्शन सोडली. दोन इंजेक्शनच्यावेळी गुरगुरणारा बिबट्या तिसऱ्या इंजेक्शन मध्ये गारद झाला. त्याला तात्काळ जाळ्यात पकडून वैद्यकीय उपचारासाठी संजय गांधी उद्यानात नेण्यात आले. तो भुकेला असल्याने अधिक आक्रमक होता, असे ‘पाॅज’चे नीलेश भणगे यांनी सांगितले. माळशेज घाट, बारवी धरण जंगल परिसरातून बिबट्या मलंगड जंगलात आला असावा. तेथून तो भक्ष्याचा शोध घेत तो कल्याण पूर्वेत आला असण्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला. मागील आठ महिन्यापासून बिबट्याचा ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, बदलापूर, उल्हासनगर, शहापूर, भिवंडी, पडघा, कसारा, डोळखांब भागात संचार सुरू आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या