बदलापूर: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर बापसई गावानजीक एका बिबट्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात भरधाव वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.

शुक्रवारी रात्री उशिरा हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी सकाळी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. वनविभागाच्या अंदाजानुसार, मृत बिबट्या साधारण ३ वर्ष वयाचा होता.

कल्याण अहिल्यानगर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रुंदीकरणानंतर रस्त्याचा विस्तार झाला असून, वाहनांचा वेग कमालीचा वाढला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघातही झाले आहेत. काही दिवसांपूर्वी याच मार्गावर रायते गावाजवळ भीषण अपघातात अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर रस्त्याचा आणि वेगाचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघातही झाले आहेत. त्यात रात्रीच्या वेळी अंधारात रस्ता ओलांडणाऱ्या वन्य प्राण्यांना वाहनांच्या वेगाचा अंदाज येत नाही, ज्यामुळे अशा जीवघेण्या घटना घडत आहेत.

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील मामणोली परिसर आणि मुरबाडच्या पुढील क्षेत्र हे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्ग (कॉरिडॉर) मानले जातात. येथून जवळच मुरबाडी नदीचा प्रवाह आहे, पुढे बारवी आणि उल्हास नदीचा प्रवाह आहे. ही वन्य प्राण्यांची पाणी पिण्याची स्थळे आहेत. त्यामुळे या भागात कायमच बिबट्याचा वावर दिसून येतो. हा मार्ग भीमाशंकर अभयारण्य आणि तानसा अभयारण्य या दोन मोठ्या जंगलांना जोडणारा दुवा आहे. तसेच बारवी धरण परिसर आणि या महामार्गावरून वन्य प्राण्यांची सतत ये-जा असते. त्यामुळे रस्ते किंवा विकास करताना वन्य जीवांचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत वन्य प्रेमी व्यक्त करत आहेत.

प्रतिक्रिया: महामार्ग प्राधिकरणाने रस्ते बांधताना वन्य जीवांच्या सुरक्षेचा विचार करणे आवश्यक आहे. या भागात प्राण्यांचा नैसर्गिक वावर असल्याने तिथे तातडीने भुयारी मार्ग बांधायला हवेत, जेणेकरून वन्यप्राणी सुरक्षितपणे रस्ता ओलांडू शकतील. – अविनाश हरड, मानद वन्यजीव संरक्षक