ठाणे : सात-आठ वर्षांपूर्वीच्या तुलनेत बिबट्यांची संख्या चौपट वाढली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर तसेच अहिल्यानगर परिसरात बिबट्यांचे प्रमाण अधिक दिसून येते. आतापर्यंत सुमारे अडीचशे बिबटे पकडण्यात आले असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात आता ‘बिबट्या सफारी’ सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये बुधवारी वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या दरबारात नागरिकांच्या तक्रारी निवदेन स्विकारून त्या निकाली काढण्याचे काम नाईक यांनी केले. या दरबारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची वस्तुस्थिती आहे.
साधारण सात-आठ वर्षांपूर्वीच्या तुलनेत ही संख्या चौपट वाढली आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर तसेच अहिल्यानगर परिसरात बिबट्यांचे प्रमाण अधिक दिसून येते. आता नाशिक जिल्ह्यातही बिबटे आढळू लागले असून त्यासाठी वन विभागाची यंत्रणा सतर्कपणे कार्यरत आहे. आतापर्यंत सुमारे अडीचशे बिबटे पकडण्यात आले असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती गणेश नाईक यांनी दिली.
बिबट्या सफारीचा विचार
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘बिबट्या सफारी’ सुरू करण्याचा विचार सुरू आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांबरोबरच मराठवाडा, खानदेश या भागांचा समावेश आहे. तर, विदर्भातही ‘व्याघ्र सफारी’ उभारण्याचा आराखडा तयार केला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र योजना आखली जात असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे नाईक म्हणाले.
परदेशी टोळ्या कार्यरत
काही ठिकाणी वन्यप्राण्यांवर हल्ले करून त्यांना जखमी करण्याच्या घटना घडत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये बिबट्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यांचे धागेदोरे सापडले असून त्यातील काही आरोपींना पकडण्यात आले आहे. त्यातील काहीजण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील आहेत.
असे असले तरी, वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यांचे संबंध केवळ राज्य किंवा देशापुरते मर्यादित नसून काही परदेशी घटकांशीही त्यांचे संबंध आहेत. त्यामुळे पोलीस आणि वन विभाग या प्रकरणात गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करीत आहेत, असेही नाईक म्हणाले.
