विकासकामे होत नसल्याबद्दल ठाणे महापालिकेच्या नावाने शिमगा करण्यात मुंब्य्रातील लोकप्रतिनिधी व नागरिक आघाडीवर असले तरी करांचा भरणा करण्याबाबत मुंब्रा, कौसा पट्टय़ातील रहिवाशांचा हात यंदाही आखडता असल्याचे चित्र आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मुंब्य्रातील विकासकामांची जंत्री मांडण्यात आली असली तरी ठाणे, वर्तकनगर, उथळसरमधील रहिवाशांच्या तुलनेत मुंब्रा-कौसातील रहिवाशी जेमतेम ४० टक्के इतकाच मालमत्ता कर भरत असून पाणी बिलाची वसुली तर २२ टक्क्यांच्या पुढे सरकलेली नाही. त्यामुळे यंदाही येथील विकासकामांचा भार ठाण्यातील नागरिकांवरच पडण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिकेच्या तिजोरीत वर्षभर खडखडाट असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात एकाही मोठय़ा प्रकल्पाची घोषणा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली नाही. तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांच्या कार्यकाळात मालमत्ता कर, स्थानिक संस्था कराची थकबाकी मोठय़ा प्रमाणावर रोडावल्याने ठेकेदारांची बिले अदा करण्यासाठी पैसे नाहीत, अशी परिस्थिती काही काळ निर्माण झाली होती. जयस्वाल यांनी मात्र पदावर येताच पालिकेचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत मालमत्ता कराची वसुली तब्बल ९४ टक्के तर पाणी बिलाची ७२ टक्क्यांपर्यंत पोहोचविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.
असे असले तरी मुंब्रा आणि कौसातील रहिवाशी अजूनही महापालिकेला दाद द्यायला तयार नाहीत, असेच चित्र आर्थिक वर्ष संपता संपता दिसून येत आहे. महापालिकेतील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागणीच्या तुलनेत मुंब्य्रातून जेमतेम ४० टक्के इतकीच मालमत्ता कराची वसुली झाली असून पाणी बिलाची अद्याप ७५ टक्क्यांपेक्षा अधिक वसुली शिल्लक आहे. मुंब्य्राच्या तुलनेत ठाणे शहर, उथळसर, वर्तकनगर भागांतून महापालिकेच्या तिजोरीत पैशांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. महापालिकेने गेल्या वर्षांसाठी आखलेल्या वसुली लक्ष्यापेक्षा अधिक मालमत्ता कराची वसुली ठाणे शहरातील नौपाडा, पाचपाखाडी या भागांतून झाली आहे. उथळसर, कळवा, रायलादेवी अशा प्रभाग समित्यांमधूनही मालमत्ता आणि पाणीपट्टीची उत्तम वसुली झाली आहे. बेकायदा बांधकामांनी घेरलेल्या कळव्यातील रहिवाशांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक प्रमाणात मालमत्ता आणि पाण्याची बिले भरली आहेत. कळव्यास लागूनच असलेल्या मुंब्रा, कौसात मात्र वसुलीचा थांगपत्ता नसल्याने महापालिकेतील राजकीय वर्तुळात या अनुशेषावरून नवा वाद उभा ठाकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.