scorecardresearch

भिवंडीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ग्रंथालयाची सुविधा ; श्री साई सेवा संस्था आणि पोलीस प्रशासनाचा संयुक्त उपक्रम

मुस्लीम बहुल भाग आणि कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात प्रशासकीय अधिकारी घडविण्यासाठी ठाणे पोलिसांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलीस संकुलाच्या आवारातच सुमारे एक हजार चौरस फुटांच्या आवारात अभ्यासिका तयार केली आहे.

किशोर कोकणे-निखिल अहिरे
ठाणे : मुस्लीम बहुल भाग आणि कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात प्रशासकीय अधिकारी घडविण्यासाठी ठाणे पोलिसांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलीस संकुलाच्या आवारातच सुमारे एक हजार चौरस फुटांच्या आवारात अभ्यासिका तयार केली आहे. त्यामुळे भिवंडीतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ठाणे किंवा कल्याणमधील मोठी ग्रंथालय गाठावी लागणार नाहीत.
भिवंडीतील अनेक उच्चशिक्षित मुलांना स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असते. परंतु अपुऱ्या अभ्यासिका तसेच पुरेशी अद्ययावत पुस्तकेही उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांना ठाणे किंवा कल्याण येथील ग्रंथालय गाठावे लागते. दररोज वाहतुकीचा खर्च होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य सुटत असते. काही महिन्यांपूर्वीच भिवंडीतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहरातील श्री साई सेवा संस्था या संस्थेच्या संस्थापिका डॉ. स्वाती सिंग यांना पत्र पाठवून एखादी अभ्यासिका उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. याची माहिती डॉ. स्वाती यांनी भिवंडीचे उपायुक्त योगेश चव्हाण यांना दिली.
योगेश चव्हाण यांनी तात्काळ अशा विद्यार्थ्यांना पोलीस संकुल आवारातील सुमारे एक हजार चौरस फुटाचे सभागृह उपलब्ध करून दिले. सुमारे दोन आठवडय़ांपासून साई अभ्यासिका नावाने ही अभ्यासिका सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना नि:शुल्क अभ्यासिका उपलब्ध झाल्याने अभ्यासिकेकडे ओढा वाढला आहे. भिवंडी शहरात स्पर्धा परीक्षा देणारे सुमारे २० हून अधिक विद्यार्थी दररोज येथील अभ्यासिकेमध्ये अभ्यासासाठी किंवा वाचनासाठी येत आहेत. या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच महिला पोलीस शिपाईदेखील येत आहेत.
नोकरीच्या ठिकाणीच परीक्षांचा अभ्यास
स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याबरोबरच नोकरीचीदेखील गरज होती. भिवंडीतील साई अभ्यासिका सुरू झाल्याने येथे ग्रंथपाल म्हणून नोकरीदेखील मिळाली. यामुळे नोकरीच्या ठिकाणीच परीक्षांचा अभ्यास करता येत आहे. या परीक्षांची अद्ययावत पुस्तके या अभ्यासिकेत उपलब्ध असल्याने अभ्यास करण्यास मदत होत असल्याचे मत या अभ्यासिकेतील विद्यार्थी नितीन पाटील यांनी व्यक्त केले.
भिवंडी शहरामध्येही अधिकारी घडावेत यासाठी आम्ही ही अभ्यासिका सुरू केली आहे. या उपक्रमास भिवंडी शहरातील विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.-योगेश चव्हाण, उपायुक्त, भिवंडी.

श्री साई सेवा संस्था आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने भिवंडीत सुरू करण्यात आलेल्या साई अभ्यासिकेमुळे येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास मोठी मदत होणार आहे. प्रामुख्याने या अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे. – डॉ. स्वाती सिंग, संस्थापिका, श्री साई सेवा संस्था, भिवंडी

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Library facilities students bhiwandi prepare competitive examinations joint venture shri sai seva sanstha police administration amy

ताज्या बातम्या