महापारेषण कंपनीच्या पडघा येथील ४४० किलोवॅट उच्चदाब वीज वाहिनीत मंगळवारी सकाळी १० वाजता अचानक बिघाड झाला. त्यामुळे या उच्चदाब वीज वाहिनीवरून वीज पुरवठा होणाऱ्या बदलापूर, कल्याण पूर्व, डोंबिवली, एमआयडीसी, २७ गावं, पलावा सिटी परिसराचा वीजपुरवठा मंगळवारी सकाळी खंडित झाला. अशाप्रकारे वीजपुरवठा खंडित होण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान १० वाजता खंडीत झालेला वीज पुरवठी ५५ मिनिटांनी पूर्ववत झाला.

कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाड दुरुस्तीचे काम महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हाती घेतले होते. वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिली.

५५ मिनिटांनी वीज पुरवठा पूर्ववत झाला असला तरी यादरम्यान आधीच उष्णता वाढली असल्याने लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अंगाची लाहीलाही होत असताना वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्ण, लहान बाळं, वृद्ध यांना त्रास सहन करावा लागला. घरातून कार्यालयीन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही वीज पुरवठा बंद झाल्याने काही काळासाठी कोंडी झाली होती.