भगवान मंडलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : मुंबई महानगर क्षेत्रात ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ या शहरांचे गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले. येथे आणखी मोठमोठय़ा गृहप्रकल्पांची कामे होत असल्याने आगामी काळात शहरांची लोकसंख्या वाढणार आहे. असे असताना या शहरांना पाणी पुरवठा करणारे स्रोत मात्र मर्यादितच असून त्यामध्ये वाढ करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही. जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे समितीने सुचविलेल्या उपाययोजनांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून भविष्यात या शहरांना जलचिंता सतावणार असल्याची भीती तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

मुंबई महानगरातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ शहराचे गेल्या काही वर्षांत महत्व वाढले आहे. या शहरांमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पालिकांमार्फत विविध पायाभूत प्रकल्प उभारले जात आहेत. या शहरांचे झपाटय़ाने नागरीकरण होत असताना दुसरीकडे या शहरांना पाणी पुरवठा करणारे स्रोत मात्र मर्यादित असून त्यामध्ये बारवी, भातसा, आंद्रा या धरणांचा समावेश आहे. आंद्रा, बारवी धरणातून दररोज उल्हास नदीच्या माध्यमातून १२३९ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा ठाणे परिसरातील शहरांना केला जातो. शाळा, औद्योगिक विभाग, ग्रामपंचायती यांना सुमारे ८० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो.

हेही वाचा >>>मनसे नेते अमित ठाकरे उद्या ठाण्यात

पाण्याच्या मंजूर कोटय़ातूनच नवीन वसाहतींना पाणी पुरवठा दिला जात असून यामुळे जुन्या आणि नवीन वसाहतींमध्ये पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने तिथे टंचाईची समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नवी मुंबई परिसराचे झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. या नवीन वस्तीला उपलब्ध जलस्रोतांमधून एमआयडीसी, पालिकांकडून शासन आदेशाने पाणी पुरवठा केला जात आहे. पाण्याच्या या सहानुभूतीच्या वाटपामुळे मूळ शहरातील जुन्या वस्तीला कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू झाल्याने येत्या काळात पाण्यावरून या भागात असंतोषाची दरी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा >>>“हिंमत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, मी तुमच्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार”, आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

चितळे समितीकडे दुर्लक्ष

ठाणे पलिकडील शहरांमधील भविष्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांची १९९८ मध्ये समिती नेमली होती. समितीने एमएमआर क्षेत्रातील ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, उल्हासनगर परिसरातील गावांचा भविष्यकालीन पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील काळू, शाई, पोशीर, पालघर जवळील पिंजाळ, सुसरी धरणे होणे महत्त्वाचे आहे, असे अधोरेखित केले होते. या भागाची लोकसंख्या नजिकच्या काळात सुमारे दीड कोटीहून अधिकचा टप्पा गाठणार आहेत. या वाढत्या वस्तीची १५२९ एमएलडी पाण्याची गरज भागविण्यासाठी या धरणांची कामे विहित टप्प्यात पूर्ण झाली तरच विस्तारित भागातील पाण्याची गरज शासन भागवू शकेल, असे समितीने अहवालात म्हटले होते. २०१६ पर्यंत या प्रस्तावित धरणांचे महत्त्वाचे टप्पे बांधून पूर्ण केले जाणे अपेक्षित होते. परंतु निधी, भूसंपादन, स्थानिक विरोध या कारणांमुळे शासनाने चितळे समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भविष्यात पाणी समस्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी येत्या काळात शाई, काळू, मोरबे, पिंजाळ, पोशिर धरणे उभारणीवर भर देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुंबई, ठाणे परिसरातील भविष्यकालीन लोकसंख्येचा विचार करून काळू, मुंबरी (भातसा) धरणांची कामे सुरू आहेत. लवकरच ही धरणे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काळूतून दररोज ११४० एमएलडी पाणी पुरवठा उपलब्ध होईल. – संदीप नलावडे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग.

कडोंमपाची २०५१ पर्यंत लोकसंख्या ७४ लाख असेल. या वस्तीसाठी प्रतिदिन १३१० एमएलडी पाण्याची गरज असेल. पालिकेने वाढीव पाण्याची नोंदणी शासनाकडे नोंदवली आहे. प्रस्तावित कुशिवली धरणातून कडोंमपाला किती पाणी पुरवठा होऊ शकतो. याची चाचपणी शासनाकडून सुरू आहे. – अर्जुन अहिरे, शहर अभियंता, कडोंमपा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Limited sources of water supply to cities in thane district amy
First published on: 19-02-2024 at 02:55 IST