Dombivli East Railway Station – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवाॅकखालील रस्ता दुभाजकावर मद्यपी रात्रीच्या वेळेत दारू पिण्यास बसतात. दारूच्या बाटल्या, चाखण्यासाठी आणलेले खाद्यपदार्थ तेथेच टाकून निघून जातात. प्लास्टिकच्या पिशव्यांमधून हे साहित्य आणले जाते. त्यामुळे रस्ता दुभाजकामध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, नासाडी झालेले खाद्य पदार्थ या भागात पडलेले असते.
डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर भागातून बाहेर पडले की मासळी बाजाराची दुर्गंधी आणि आता पूर्व भागातून पाटकर रस्त्याने बाहेर पडले की दारूच्या बाटल्यांचा खच प्रवाशांचे स्वागत करतो. या सगळ्या प्रकराने मागील काही दिवसांपासून प्रवासी हैराण आहेत. पाटकर रस्त्यावर संध्याकाळी सात वाजल्यापासून मद्यपी दारू पिण्यास बसतात. याठिकाणी गर्दुल्ले, मद्यपी, मागतेकरी यांचा अड्डा झाला होता. याविषयी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडे अनेक महिलांनी तक्रारी केल्या होत्या. आयुक्त जाखड यांच्या आदेशावरून फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी एकत्रितपणे मोहीम राबवून पाटकर रस्त्यावरील मद्यपींवर कारवाई केली होती. या भागातील दारू विक्री दुकान बंद करून त्याचा परवाना रद्द करण्याची शिफारस उत्पादन शुल्क विभागाला पालिकेकडून करण्यात आली होती.
या भागातील दारूच्या दुकानामुळे मद्यपी या भागात खरेदीसाठी येतात. ते दारू खरेदी करून रस्त्यावरील दुभाजकामध्ये बसून उघड्यावर दारू पितात. रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी हा सगळा प्रकार बघतात. रात्रभर हा प्रकार सुरू असतो. पालिका, पोलिसांनी कारवाई केल्यापासून हा प्रकार थांबला होता. आता रात्रीच्या वेळेत हा प्रकार पुन्हा सुरू झाला आहे, अशा तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. रात्रीच्या वेळेत पाटकर रस्ता भागातून महिला, पुरुष जात असेल तर हे मद्यपी त्यांची छेडछाड करतात. त्यांच्या जवळील किमती ऐवज, मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात, अशा तक्रारी आहेत.
पाटकर रस्त्यावर पुन्हा मद्यपी बसण्यास सुरुवात झाली असेल तर रामनगर पोलिसांच्या साहाय्याने या भागातील मद्यपी हटविण्याची मोहीम पुन्हा हाती घेण्यात येईल. रस्ता दुभाजकामधील कचरा काढून टाकण्याच्या सूचना घनकचरा विभागाला केल्या जातील. रस्ता दुभाजकामध्ये कचरा टाकणारा निदर्शनास आला तर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. – भारत पवार, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.