भाषा विकासासाठी सकस लिखाणाची आवश्यकता असताना साहित्यिक नेमक्या याच अंगाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यांच्या लिहिण्याने भाषेच्या विकासाला हातभार लागत असतो. साहित्य हा भाषेचा एक व्यवहार आहे आणि तो मराठीतून होतो. मात्र जगण्याचे इतरही अनेक व्यवहार आहेत. ते इतर भाषेत होत असतील, तर भाषावाढीसाठी त्याचा उपयोग होत नाही. मराठीचे कार्यक्षेत्र विस्तारत नाही, कारण ते वाढवण्यासाठी व्यापक प्रयत्न होत नाहीत. भाषा ही माणसांच्या कर्तृत्वावरून वाढत असते. ते मराठी माणसाने वाढवायला हवे, असे ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून डॉ. मोरे यांचा गुरुवारी ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष मा. य. गोखले, विद्याधर ठाणेकर, दा. कृ. सोमण, आणि विद्याधर वालावलकर उपस्थित होते. या वेळी प्रा. डॉ. वीणा सानेकर यांनी मोरे यांची मुलाखत घेतली. ते म्हणाले, की घुमान येथे होणाऱ्या आणि इतर भागांमध्ये होणारे साहित्य संमेलन यात गुणात्मक फरक आहे. नामदेव घुमानमध्ये गेले तेव्हा तेथे मराठी माणसे नव्हती. तरीही त्यांनी तेथे आपले विचार रुजवले. पूर्वसुरींचा हा इतिहास उजळण्याबरोबरच आजच्या पिढीला त्यांच्या कर्तृत्वाचा साक्षात्कार घडवण्यासाठी हे संमेलन महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यातूनच प्रेरणा घेऊन आजची पिढी मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करेल.
प्रश्न अस्तित्वाचा ..
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी झगडा सुरू आहे, मात्र असा दर्जा दिल्याने भाषेसाठी निधी प्राप्त होईल, मराठी माणसांच्या मनात भाषेबद्दलची आपुलकी निर्माण होईल. मात्र भाषेच्या विकासासाठी काय करता येईल, असा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. भाषा हा जगण्याचा एक हिस्सा आहे. त्यामुळे भाषेची सांगड जगण्याशी घातली पाहिजे. भाषेचा प्रश्न अस्तित्वाचा प्रश्न झाला पाहिजे. तो अस्मितेपुरता मर्यादित राहता कामा नये, असे मोरे म्हणाले.

दर २५ वर्षांनी इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे..
संत तुकारामांना केंद्रस्थानी ठेऊन महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर लोकमान्य ते महात्मा महाराष्ट्रातील दोन व्यक्तिमत्त्वे केंद्रस्थानी मानून इतिहास लिहिता आला. प्रत्येक महापुरुषाच्या विचारांचा त्यावेळच्या समाजजीवनावर खोलवर परिणाम होत असतो. तो वाढविण्याचा प्रयत्न नव्याने व्हायला हवा. कारण दर २५ वर्षांनंतर समाजाचा पोत बदलतो. राहणीमान, जीनवशैली, भाषा, विचारसरणी, कल्पना बदलत राहतात. त्यामुळे इतिहासाचा आणि मान्यवरांच्या चरित्रांचे पुनर्लेखन करून ते कालसुसंगत करण्याची गरज आहे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

इतिहासातील अनेक महापुरुषांच्या विचारांचा संप्रदाय बनला आहे. असे झाले की लोक विचारांपेक्षा शब्दांना चिकटून बसतात. त्यामुळे महापुरुषांच्या विचारांचा कालसापेक्ष विचार होण्याचे थांबून जाते.
– डॉ. सदानंद मोरे