आधारवाडी येथील डॉन बॉस्को चौकातील नाके ढाबे, टपऱ्यांनी व्यापले; लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांचाही सहभाग
कल्याण पश्चिमेतील रस्तारुंदीकरण करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांच्या अवतीभोवतीच्या ओसाड जागांवर स्थानिक नगरसेवक, त्यांचे नातेवाईक, भूमिपुत्रांनी कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावर २०३ एकर जागेवर नवीन कल्याणची उभारणी होणार असल्याने पालिकेच्या ओसाड जागा हडपण्याचे प्रयत्न आधारवाडी परिसरात सुरू आहेत.
आधारवाडी, श्री कॉम्पलेक्स, उंबर्डे, गंधारे नदीकडे जाणारे रस्ते पालिकेने रुंद केले आहेत. रस्त्याच्या कडेच्या जागा पालिकेच्या आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने स्थानिक भूमिपुत्र मोक्याच्या जागा बळकावून तेथे ढाबे, ताडपत्री लावून हॉटेल, टपऱ्यांची उभारणी करू लागले आहेत. आधारवाडी परिसरात नवीन गृहसंकुले उभी राहिली आहेत. मोकळ्या जागा, रुंद रस्त्यांमुळे या भागातील रहिवासी रेल्वे स्थानकातील गजबजाट पाहून आपण कसे सुखी आहोत हे नेहमीच सांगत असतात. असे असताना गेल्या काही महिन्यांपासून या गृहसंकुलांच्या परिसरात ढाबे, टपऱ्या उभ्या राहू लागल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. रेल्वे स्थानकासारखा फेरीवाल्यांचा बजबजाट या भागात सुरू होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी श्री कॉम्पलेक्स, मंगेशीधाम परिसरातील रहिवाशांनी मागणी आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांच्या कोपऱ्यावर स्थानिक दादांनी ताडपत्र्या टाकून राहुटय़ा उभारल्या आहेत. या राहुटय़ांमध्ये दिवसभर शुकशुकाट असतो. संध्याकाळी सातनंतर या राहुटय़ांमध्ये चायनीज, मद्यपाटर्य़ाचा धिंगाणा सुरू असतो. आधारवाडी परिसरातील बहुतांशी रस्त्यांचे कोपरे ढाबे, फेरीवाल्यांनी व्यापून टाकण्यास सुरुवात केली आहे. या भागातील स्थानिक नगरसेवक, राजकीय पुढारी या विषयावर मौन बाळगून असल्याने रहिवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. काही नगरसेवक, राजकीय मंडळींच्या नातेवाईक, समर्थक हेच हे ढाबे, टपऱ्या टाकाव्यात म्हणून आघाडीवर आहेत, अशी चर्चा आहे.
महापालिका प्रशासनाने आधारवाडी परिसरातील मुख्य रस्त्यांच्या कोपऱ्यावर उभे राहणारे ढाबे, टपऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सुरुवातीला ताडपत्र्यांनी राहुटय़ा उभारायच्या. मग हळूहळू तेथे विटांचे पक्के बांधकाम करायचे आणि काही दिवसांनी त्याच जागेवर दोन ते तीन माळ्यांचे बांधकाम करून हॉटेल किंवा व्यापारी संकुल सुरू करायचे, अशी पद्धत असते. त्याच पद्धतीने आधारवाडी परिसरातही हालचाली सुरू आहेत.