ठाणे : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे -बोरीवली भुयारी मार्गाला विरोध करत स्थानिक रहिवाशांनी दोन दिवसांपुर्वी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर ठाणे पोलिसांनी मध्यस्थी करत एमएमआरडीए अधिकारी आणि रहिवाशांची उद्या, मंगळवारी सायंकाळी एक बैठक आयोजित केली असून यामध्ये रस्ते मार्गाऐवजी मुल्लाबाग ते युनी अबेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग नेण्याबाबत चर्चा होणार आहे. याशिवाय, यासंबंधी मुंबई आयआयटीने पाहाणी करून केलेल्या अभ्यासाचा अहवालही अधिकाऱ्यांकडून सादर होण्याची शक्यता आहे.

मानपाडालगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गाने नटलेला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामुळे येथे मोठा हरित पट्टा आहे. याच भागात निळकंठ वुडस, निळकंठ ग्रीन, व्हेराटन, काॅसमाॅस लाउंज, सत्यशंकर अशी मोठी गृहसंकुले आहेत. याठिकाणी सुमारे १२ हजाराहून अधिक नागरिक राहत आहेत. याशिवाय, या भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. यामुळे भविष्यात या भागाची लोकसंख्या ३० हजारांच्यापुढे जाईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

याच परिसरात एमएमआरडीएमार्फत ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग निर्माणचे काम सुरू आहे. त्यासाठी येथील जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवून हरित पट्टा नष्ट करण्यात आला आहे. त्याचबरोबर भुयारी मार्गाच्या खोदकामादरम्यान निघणाऱ्या मातीची दररोज शेकडो डम्परद्वारे वाहतूक होत असून यासाठी डम्परच्या रस्त्याकडेला रांगा लागत आहेत. यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. तसेच माती वाहतूकीमुळे धुळ प्रदुषणात वाढले आहे. ते रोखण्यासाठी यंत्रेही येथे बसविण्यात आली आहेत. मात्र, ती बंदावस्थेत आहेत.

या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या मुल्लाबाग परिसरातील गृहसंकुलामधील रहिवाशांनी शनिवारी सकाळी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. रस्ते मार्गाऐवजी मुल्लाबाग ते युनी अबेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा अशी प्रमुख मागणी रहिवाशांनी केली होती. ही मागणी मान्य झाली नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रहिवाशांनी दिला.

आंदोलनकर्त्यांनी या परिसरातील वाहतूक काहीकाळ रोखून धरली होती. ठाणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनांची समजूत काढत वाहतूक सुरळीत केली. तसेच या प्रकरणात मध्यस्थी करत पोलिसांनी एमएमआरडीए अधिकारी आणि रहिवाशांची मंगळवारी सायंकाळी एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला एमएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अभियंता विशाल जांभळे हे उपस्थित राहणार आहेत. या वृत्तास स्थानिक रहिवाशी नितीन सिंग आणि डाॅ. लतिका भानुषाली यांनी दुजोरा दिला आहे.

आयआयटी अहवाल होणार सादर ?

ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग मुल्लाबाग येथून रस्ते मार्गे पुढे नेण्यात येणार असून येथील संकुलांच्या प्रवेशद्वाराजवळच पथकर नाका उभारला जाणार आहे. त्यामुळे भुयारी मार्गाच्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही पण, हा मार्ग रस्ते मार्गे नेण्याऐवजी मुल्लाबाग ते युनी अबेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा अशी मागणी रहिवाशांनी केली होती.

या संदर्भात रहिवाशांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली होती. त्यावेळी याबाबत मुंबई आयआयटीमार्फत अभ्यास करून पाहाणी अहवाल सादर करू असे आश्वासन दिले होते. मात्र, हा अहवाल अद्याप रहिवाशांपुढे सादर करण्यात आलेला नाही. दरम्यान, मंगळवार सायंकाळच्या बैठकीत अधिकारी हा अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.